अकोला : सध्या कोरोना काळात रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची रुग्णवाहिका चालकांकडून भरमसाट लूट करण्यात येत आहे. नातेवाइकांकडून जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी मनमानी पद्धतीने भाडे आकारण्यात येत आहे. याला चाप बसावा या दृष्टीकोनातून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने रुग्णवाहिकेचे भाडेदर निश्चित केले आहेत. कोरोनाचा काळ असल्यामुळे दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मृत्यूसुद्धा वाढत आहेत. त्यामुळे रुग्णवाहिका चालकांकडून परिस्थितीचा फायदा घेण्यात येत आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून मनमानी पद्धतीने दर आकारण्यात येत होते. याबाबत अनेकांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली हाेती. या तक्रारीची दखल घेत, आरटीओने रुग्णवाहिकेबाबत दर निश्चित केले आहेत.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी शहरातील रुग्णवाहिका चालकांना दर निश्चितीचे पत्र प्रदान केले. रुग्णवाहिका चालकांनी निश्चित दरापेक्षा अधिक आकारणी केल्यास किंवा नागरिकांकडून तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित रुग्णवाहिका चालकाविरुद्ध मोटार वाहन कायदा व नियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी दिला आहे. रुग्णवाहिकेतून कोविड रुग्णाची वाहतूक करावयाची असल्यास, उपरोक्त दराव्यतिरिक्त पीपीई किट व वाहन निर्जंतुकीकरणासाठी एकूण ८०० रुपये अतिरिक्त भाडे द्यावे लागणार आहे.
असे आहेत दर...
मारुती व्हॅन (मनपा क्षेत्र) ५०० रुपये प्रति एक फेरी (२५ किमीपर्यंत), जिल्ह्याबाहेर १ हजार रुपये (११ रुपये प्रति किमी), टाटा सुमो व मॅटॅडोर (मनपा क्षेत्र) ६०० रुपये प्रति एक फेरी (२५ किमी), मनपा क्षेत्र सोडून १४०० रुपये, जिल्ह्याबाहेर १२ रुपये प्रति किमी, टाटा ४०७, स्वराज, मझदा मनपा क्षेत्र ७०० रुपये प्रति फेरी (२५ किमी), मनपा क्षेत्र सोडून १३०० रुपये, जिल्ह्याबाहेर १४ रुपये प्रति किमी आणि आयसीयू किंवा वातानुकूलित वाहने (मनपा क्षेत्र), मनपा क्षेत्र वगळता, जिल्ह्याबाहेर नमूद दरात १५ टक्क्यांनी वाढ असे दर निश्चित केले आहेत.