सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोविड-१९ची लक्षणे आढळल्यास तत्काळ निदान व्हावे याकरिता निंबा फाटा येथे उरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. हर्षाली ताडे यांच्या मार्गदर्शनात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ४४ नागरिकांचे स्वॅब तपासणीकरिता घेण्यात आले. याकरिता डाॅ. ऊजर खान, डाॅ. पूनम गावंडे, विलास सोनकर, आरोग्य सेवक राजेश दंदाले, केतन गुंडल, आरोग्यसेवक अश्विनी वानखडे, परिचर रवी धामणे यांनी परिश्रम घेतले. (फोटो)
-------------------------------------------
हाता येथे आग; शेती उपयोगी साहित्य खाक
हाता : उरळ पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या हाता येथे श्रीकृष्ण कौसकार यांच्या मालकीच्या शेतात आग लागून गुरांचा चारा, शेतीउपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना दि. १० एप्रिल रोजी घडली.
श्रीकृष्ण कौसकार यांच्या शेतात विद्युत रोहित्र असून, या रोहित्रावरून गावाला वीज पुरवठा जोडण्यात आला आहे. वीज तारांचा स्पर्श झाल्याने शेतात आग लागली. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच ग्रामस्थांनी प्रयत्न करीत आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सद्यअस्थितीत ऊन तापत असून, गावात वीज तारा लोंबकळलेल्या असल्याने पुन्हा आगीची घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वीज तारांची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. दुसऱ्या दिवशी तलाठी वीरघल यांनी पंचनामा केला असून, या आगीत जवळपास १५ हजारांचे नुकसान झाल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे.