कस्तुरबामध्ये व्यवस्थेचा अभाव
अकाेला : जुने शहरातील डाबकी राेड येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात काेराेना चाचणी व लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी हाेत आहे. रुग्णालयात व्यवस्थेचा अभाव असून ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्या, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसत आहे. साेमवारी ज्येष्ठ महिला, पुरुष पायऱ्यांवर बसल्याचे चित्र हाेते.
तंत्रनिकेतनच्या आवारभिंतीलगत अतिक्रमण
अकाेला : शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाच्या आवारभिंतीलगत स्थानिक रहिवाशांनी अतिक्रमण थाटल्याचे दिसून येते. शेळी, मेंढीसाठी असणारा चारा या ठिकाणी विक्री केला जाताे. तसेच रिक्षा दुरुस्तीची दुकानेही भिंतीलगत उभारण्यात आली आहेत. या प्रकाराकडे तंत्रनिकेतन प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत असल्याचे चित्र आहे.
सिमेंट रस्त्याची डागडुजी
अकाेला : शहरात २०१६ मध्ये तयार करण्यात आलेल्या चार सिमेंट रस्त्यांची ऐशीतैशी झाली आहे. यापैकी अग्रेसन चाैक ते थेट दुर्गा चाैकपर्यंतच्या सिमेंट रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. नागरिकांनी ओरड केल्यानंतर कंत्राटदाराच्यावतीने सिमेंट रस्त्याची डागडुजी केली जात आहे. मागील वर्षभराच्या कालावधीत सहा ते सात वेळा रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली.
बाजारपेठेत गर्दी; नियम पायदळी
अकाेला : शहरात काेराेनाचा संसर्ग वाढत असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ हाेत असल्याचे दिसत आहे. अशा स्थितीतही बाजारपेठेत विविध साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी हाेत आहे. यादरम्यान, साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांकडे दुर्लक्ष हाेत असल्याने संसर्गाचा धाेका वाढला आहे.
लसीकरणासाठी पुढाकार घ्या!
अकाेला : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ६० वर्षांवरील वयाेवृध्द नागरिक व गंभीर स्वरूपाच्या व्याधी असलेल्या ४५ वर्षांपेक्षा अधिक नागरिकांसाठी लसीकरण माेहीम राबवली जात आहे. या लसीकरण माेहिमेसाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने साेमवारी करण्यात आले.
चाचणी करताना नियम पाळा!
अकाेला : शहरात काेराेनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. काेराेनाची लक्षणे आढळून येणाऱ्या नागरिकांनी चाचणीसाठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. रांगेत उभे राहताना नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याचे चित्र समाेर आले आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन महापाैरांकडून करण्यात आले आहे.
चाचणी केंद्रांत वाढ करा!
अकाेला : जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांना दुकाने खुली करण्यासाठी काेराेना चाचणी बंधनकारक केली आहे. चाचणीसाठी व्यापारी, कामगार व नागरिकांनी पुढाकार घेतला असता चाचणी केंद्रांवर गर्दी उसळली आहे. ही बाब पाहता महापालिकेने चाचणी केंद्रांत वाढ करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. केंद्र वाढविल्यास गर्दी टाळता येईल.