अकोला, दि. ५- केंद्र सरकारने दिलेले आश्वासन पाळून विलंब न लावता तातडीने विदर्भ राज्य निर्माण करावे, अन्यथा १ जानेवारीनंतर विदर्भातील जनक्षोभास सामोरे जावे लागेल, असा इशारा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष, माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी शनिवारी येथे दिला. स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी ५ डिसेंबर रोजी नागपूर येथील विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने गत चार वर्षांपासून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी अनेक आंदोलने केली; परंतु केंद्र सरकारने आजपर्यंंत त्या दिशेने एकही पाऊल पुढे टाकले नाही. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंग यांना वेळ मागितला; परंतु अद्याप वेळ देण्यात आला नसून, निवेदने व पत्रांचे साधे उत्तरदेखील अद्यापर्यंत देण्यात आले नाही. केंद्रातील भाजपच्या सरकारने विदर्भ राज्याबाबत दिलेल्या आश्वासनासंदर्भात किती असंवेदनशील आहे, हे यावरून लक्षात येते. तसेच जनतेच्या प्रश्नांची सरकार कोणतीही दखल घेत नसल्याचा आरोपही चटप यांनी केला. विदर्भ राज्याची निर्मिती आणि शेतकर्यांच्या आत्महत्या या प्रश्नावर आता विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने आरपारची लढाई लढण्यात येणार असून, त्यामध्ये ५ डिसेंबर रोजी नागपूरच्या विधान भवनावर मोर्चा व ठिय्या आंदोलन छेडण्यात येणार आहे. हे आंदोलन यावर्षीचे शेवटचे आंदोलन राहणार असून,१ जानेवारीपासून ह्यविदर्भ मिळवू औदाह्ण या घोषणेप्रमाणे आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज तायडे, महिला जिल्हाध्यक्ष ज्योत्स्ना बहाळे, युवा आघाडी अध्यक्ष डॉ. मनीष खंडारे, जिल्हा समन्वयक सतीश देशमुख, विभागप्रमुख प्रशांत गावंडे, जिल्हा सचिव धनंजय मिश्रा, अविनाश नाकट, कृष्णराव पाटील, राजाभाऊ देशमुख, मनोहर माहोरे, सुरेश जोगळे,प्रशांत नागे, बाळासाहेब वसू उपस्थित होते.सरकार निर्णय घेत नाही; भाजप नेत्यांचेही मौन!सरकारने वैदर्भीय जनतेला दिलेले विदर्भ राज्याचे आश्वासन, शेतकर्यांच्या प्रश्नांवर दिलेले आश्वासन, विदर्भात शेतकर्यांच्या होत असलेल्या आत्महत्या या सर्वच प्रश्नांवर केंद्र सरकार कोणतेही निर्णय घेत नाही आणि यासंदर्भात विदर्भातील भाजपाचे नेतेही मौन पाळत असल्याचा आरोप वामनराव चटप यांनी केला.पाच ठिकाणाहून निघणार विदर्भ दिंडी!विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने नागपूरच्या विधान भवनावर ५ डिसेंबर रोजी मोर्चा व ठिय्या आंदोलन छेडण्यात येणार आहे. याबाबत जनजागृतीसाठी विदर्भाच्या पाच सीमेवरून १ डिसेंबर रोजी विदर्भ दिंडी काढण्यात येणार आहेत. त्यामध्ये पहिली दिंडी सिंदखेडराजा, दुसरी दिंडी उमरखेड, तिसरी दिंडी देवरी, चौथी दिंडी शेंडगाव व पाचवी दिंडी कालेश्वर येथून निघणार आहे.
विदर्भ राज्य करा; अन्यथा जनक्षोभास सामोरे जा!
By admin | Published: November 06, 2016 2:04 AM