अकोला : टोमॅटो पिकावर तिरंगा व्हायरस आल्याची अफवा पसरल्यामुळे टोमॅटो पिकावर संकट आले आहे. टोमॅटो खरेदी करताना ग्राहकही विचारणा करत असल्याने विक्रेत्यांना उत्तर देतानामोठी अडचण निर्माण झाली आहे. टोमॅटो हे पीक पुणे, नारायणगाव, नाशिक, सटाणा या भागात मोठ्या प्रमाणात घेतले जात असून, विदर्भातही खरीप आणि रब्बी मिळून जवळपास आठ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकरी टोमॅटो पीक घेतात. हेक्टरी २२ ते २५ टन उत्पादन घेतले जाते.तिरंगा व्हायरस आल्याची अफवा पसरल्याने टोमॅटो घेताना ग्राहक सावधानता बाळगत आहेत. त्यामुळे टोमॅटोचे दर घटले आहेत. याचा फायदा व्यापारी घेताना दिसत असून, घाऊक बाजारात १० ते १५ रुपये किलोने विकला जाणार टोमॅटो ५ ते १० रुपयापर्यंत खाली आले आहेत. याबाबत अनेक तज्ज्ञांनी आरोग्याला घातक नसल्याचे सांगितले.टोमॅटोवर आलेला रोगआणि कोविड-१९ यांचा दुरान्वये सुद्धा कोणताही संबंध नाही. टोमॅटोविषयी उगीचच गैरसमज पसरवूनये, असे आवाहन फलोत्पादन आयुक्त डॉ. बी. एन. एस. मूर्ती, माकपच्या किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केले आहे.टोमॅटोवर तिरंगा व्हायरस आला याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. पिकांवर कीड, रोग येत असतो हे सामान्य आहे. त्याचे व्यस्थापन करण्यात येते. म्हणून मानवी आरोग्याला त्याचे कुठलेच नुकसान होत नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता टोमॅटो खरेदी करावे.डॉ. एस. एम. घावडे, विभाग प्रमुख, भाजीपाला शास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ