अकोला : भारतीय सेवा सदनद्वारा संचालित असलेल्या वसतिगृहातील रोजंदारी कामावरील युवकाला कायम करून घेण्यासाठी त्याचा लैंगिक छळ करणारे संस्थेचे माजी अध्यक्ष निरंजनकुमार गोयनका व जुगलकिशोर रुंगटा यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना मंगळवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. एस. जांभळे यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यानंतर आरोपींनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज सादर केला असून, या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात रोजंदारीवर काम करणार्या पीडित युवकाने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याला कायमस्वरूपी नोक रीचे आमिष दाखवून निरंजनकुमार गोयनका व जुगलकिशोर रुंगटा यांनी त्याचा आठ वर्ष लैंगिक छळ केला; मात्र नोकरीत कायम केले जात नसल्याचे पाहून युवकाने आरोपींच्या अश्लील चाळय़ांची चित्रफीत तयार केली. त्यानंतर युवकाने दिलेल्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन्स पोलिसांनी गोयनका व रुंगटा या दोघांविरुद्ध लैंगिक छळाचे गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हे दाखल होताच दोन्ही आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती; मात्र अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयाने १५ जुलै रोजी दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर दोन्ही आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज सादर केला; मात्र उच्च न्यायालयाने आरोपींना दिलासा न देता त्यांना २४ ऑगस्टपपर्यंत अटक न करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. जामिनासाठी पर्यायच नसल्याने रुंगटा व गोयनका दोन्ही सोमवारी सकाळी १0 वाजता सिव्हिल लाइन्स पोलिसांसमोर शरण आले. त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. मंगळवारी पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. एस. जांभळे यांच्या न्यायालयाने दोन्ही आरोंपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यानंतर आरोपींनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज सादर केला; मात्र या अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली नसून, बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अँड. राजेश औशल यांनी कामकाज पाहिले.
रुंगटा, गोयनका कारागृहात
By admin | Published: August 19, 2015 1:54 AM