अकाेला : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून, कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत माेठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशावेळी कोरोनाबाधित रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या औषधांपैकी रेमडेसिवीर या इंजेक्शनसाठी धावाधाव सुरू आहे. इतर औषधांचा साठा मात्र उपलब्ध असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सक्रिय रुग्णांचा आकडा सात हजारांपेक्षा अधिक आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या हायड्रोकार्ब्ड, मिथील प्रेडनी सोलेन, लोमॉलीक्युलर वेट हेपॅरीनसह, फॅबीपिरॅवीर टॅब्लेट अन्य आवश्यक औषधी जिल्ह्यात उपलब्ध आहे. कोरोनासंदर्भाने आवश्यक असलेल्या औषधी विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेल्या औषधी साठ्याची दररोज माहिती घेण्यात येते. त्यामुळे गरजेनुरूप जिल्ह्यात आवश्यक औषधी उपलब्ध होत असल्याचे एका घाऊक औषधी विक्रेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’शी बोलताना माहिती दिली.
दुसरीकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही औषधींचा साठा भरपूर असल्याचेही रुग्णालयातील सूत्रांनी स्पष्ट केले. कोरोनाबाधितांवरील उपचाराच्या दृष्टीने फॅबीपिरॅवीर टॅब्लेट, हायड्रोकार्ब्ड, मिथील प्रेडनी सोलेन, लोमॉलीक्युलर वेट हेपॅरीनसह अन्य औषधांचा साठा उपलब्ध आहे. परंतु हाफकिनकडून कोरोनासंदर्भाने औषधी साठा तुलनेने कमी येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्ह्याची रेमडेसिविर इंजेक्शनची दररोजची गरज खासगी आणि शासकीय रुग्णालय मिळून जवळपास एक हजार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या तुलनेत जिल्ह्याला दररोज २०० ते ३०० च्या आसपास रेमडेसिविर इंजेक्शन मिळत आहे. शासकीय रुग्णालयातील रुग्णांसाठी रेमडेसिविरची अडचण नसली तरी खासगी रुग्णालयात त्याची अडचण असून, त्यासाठी रुग्णांची धावपळ होत आहे.
.........
ऑक्सिजनवर असलेले रुग्ण
जिल्ह्यात शनिवारी २५३ रुग्ण ऑक्सिजनवर असल्याची माहिती आहे. यामध्ये आयसीयूमध्ये ऑक्सिजनवर असलेले २०५, व्हेंटिलेटरवर ४८ रुग्ण असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तपासणी किटही माफक प्रमाणात
जिल्ह्यात कोरोनाच्या चाचणीसाठी वर्तमान स्थितीत रॅपिड टेस्ट, आरटीपीसीआरसाठीही किट उपलब्ध आहेत. आतापर्यंत जवळपास तीन लाखांपेक्षा अधिक किटचा संदिग्धांच्या तपासणीसाठी वापर झालेला असल्याचे सूत्रांनी सांगितले.