अकोला: जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थिनी, महिलांना वैयक्तिक स्वच्छतेसाठी स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन्स पुरवठा करण्यासाठी महिला बचत गटांना ‘अस्मिता अॅप’ चा वापर करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले; मात्र त्याचा प्रत्यक्षात फायदा अद्यापही झाला नसल्याची माहिती आहे.ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थिनी, महिलांना वैयक्तिक स्वच्छतेसाठी सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्याची योजना ‘अस्मिता’ नावाने सुरू करण्यात आली. त्या योजनेचे उद्घाटन ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात झाले. त्यावेळी जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या जवळपास ३०० महिला उपस्थित होत्या. सहायक प्रकल्प अधिकारी भुसारी यांनी अस्मिता अॅप डाउनलोड करण्यापासून ते वापर करण्याबाबतचे प्रशिक्षण दिले. जिल्ह्यात जवळपास ८०० पेक्षाही अधिक नोंदणीकृत बचत गटामार्फत ही सेवा देण्याचे त्यावेळी ठरले. आता चार महिने उलटून गेले तरीही या उपक्रमाचा फायदा मुली-महिलांना झालेला नाही. ठरल्याप्रमाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे नोंदणीकृत असलेल्या महिला बचत गटाद्वारे शाळा आणि गावातील ठरलेल्या ठिकाणी या नॅपकिन्सची विक्री केली जाणार आहे. अवघ्या पाच रुपयांत ही सेवा उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी महिला बचत गटांना अल्प दरात नॅपकिन्सचा पुरवठा शासनाने ठरवून दिलेल्या संस्थेकडून होणार आहे. बचत गटांतील महिलांनी अस्मिता अॅपद्वारे मागणी नोंदवल्यानंतर त्यांना पुरवठा होईल. महिला बचत गटांनी ‘अस्मिता अॅपद्वारे रिचार्ज केल्यानंतर संबंधित संस्थेकडून पुरवठा केला जातो. जिल्ह्यात किती बचत गटांकडून या अॅपद्वारे मागणी नोंदवली जात आहे, किती गावांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्सचा पुरवठा होत आहे, याबाबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच अनभिज्ञ आहे.