- पवन वर्मालोकमत न्यूज नेटवर्कचोहोट्टा बाजार: ग्रामीण भागातील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या चोहोट्टा बाजार येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्याची मागणी गत अनेक दिवसांपासून होत आहे. अकोल्याच्या आरोग्य विभागाने तसा प्रस्तावसुद्धा तयार केला आहे; परंतु हा प्रस्ताव अनेक दिवसांपासून धूळ खात पडून असल्याचे दिसून येत आहे.अकोट-अकोला या मुख्य मार्गाच्या अगदी मध्यभागी चोहोट्टा बाजार हे मुख्य गाव आहे. या गावाला लागूनच ५२ गो जोडलेली आहेत. चोहोट्टा हे गाव अगदी सोयीस्कर पडत असल्याने या ठिकाणी येऊन परिसरातील नागरिक आपले दैनंदिन व्यवहार करतात; परंतु मुख्य ठिकाण असतानाही या ठिकाणी पाहिजे ती आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाही. एक उपकेंद्र आहे; परंतु परिसरातील गावांचा विचार करता या उपकेंद्राच्या आरोग्य सुविधा पुरू शकत नाहीत. कावसा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रआहे. ते दूर पडत असल्याने रुग्णांना त्या ठिकाणी जाणे अडचणीचे ठरते. ग्रामीण भागातील जनतेला अतिशय सोयीस्कर ठरणाऱ्या चोहोट्टा बाजार येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर व्हावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे.या मागणीसाठी गतवर्षी विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना आमदार रणधीर सावरकर यांची चोहोट्टा बाजारच्या सरपंच नीता दिलीप वडाळ व सामाजिक कार्यकर्ते पवन वर्मा यांनी नागपूर येथे जाऊन भेट घेऊन अधिवेशनादरम्यान या मागणीचा विचार व्हावा, याबाबत चर्चा केली होती. आमदार रणधीर सावरकर यांनीही रुग्णालयाच्या या मागणीला गंभीरपणे घेत तसा सतत पाठपुरावासुद्धा केला होता; परंतु ग्रामीण रुग्णालयाच्या मंजुरीसाठी नियमानुसार लोकसंख्येचे प्रमाण कमी पडत असल्याचे कारण सांगण्यात आले होते. आता पुन्हा नव्याने या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी प्रयत्न करावे, अशी मागणी चोहोट्टा सरपंच निता वडाळ, धारेलच्या सरपंच सुनीता विनोद मंगळे, टाकळी खुर्दचे मंगेश ताडे, टाकळी बु.च्या सरपंच वैशाली अमोल वसू, करतवाडीचे सरपंच सुदर्शन किरडे, करोडीच्या सरपंच प्रिया अतुल नवत्रे, किनखेडचे सरपंच रामदास नवघरे, देवर्डा-निजामपूरच्या सरपंच मीनल अतुल खोटरे, पळसोदचे सरपंच ज्ञानेश्वर आढे, रेलच्या सरपंच प्रीती शंकर घुगरे, हनवाडीचे सरपंच समाधान एरोकार, परिसरातील इतरही ग्रामपंचायतींचे सरपंच, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी केली आहे.
अपघातामुळे जातात अनेक बळीअकोट अकोला हा मुख्य महामार्ग असल्याने या मार्गावरून वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाणही अधिक आहे. अपघातात जखमी रुग्णांना उपचारासाठी अकोला येथेच घेऊन जावे लागते. गंभीर अवस्थेतील असलेला रुग्ण अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्याचा योग्यवेळी उपचाराअभावी अर्ध्यातच जीव जातो. अपघातासारख्या अशा अनेक घटनांमध्ये अकोला येथील रुग्णालयात पोहोचण्याआधीच अनेकांचा जीव गेला आहे.
ग्रामीण भागातील मुख्य ठिकाण असल्याने चोहोट्टा येथे आवश्यक त्या आरोग्य सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे, यासाठी माझा पाठपुरावा सुरूच आहे. प्रशासनाच्या नियमाप्रमाणे मंजुरीसाठी काही अडचणी येत आहेत. त्या सोडवून हा प्रश्न मार्गी लागेल, ही अपेक्षा आहे.-रणधीर सावरकर, आमदार अकोला पूर्व.