अकोला : ग्रामीण भागातील रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व उपचार उपलब्ध व्हावे, यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. शिवाय, आशा सेविकांच्या मदतीने ग्रामीण भागातली गरोदर माता व बालकांच्या सर्वांगीण आरोग्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र असून, ग्रामस्थांना प्राथमिक उपचारासाठी येथे आवश्यक सर्वच सुविधा उपलब्ध आहेत; परंतु साधा ताप आला तरी ग्रामस्थांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय गाठावे लागते. शिवाय गर्भवतींनाही प्रसूतीसाठी जिल्हा स्त्री रुग्णालय किंवा सर्वोपचार रुग्णालय गाठावे लागते. प्राथमिक उपचारासह प्रसूती प्राथमिक आरोग्य केंद्रातच व्हावी, यासाठी जिल्हा परिषद सीईओ आयुष प्रसाद यांच्या पथकाने निर्देश दिले. आरोग्य अधिकाऱ्यांसोबत सीईओ आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटी देऊन पाहणी केली, तसेच पीएचसीत आढळलेल्या त्रुटी महिनाभरात दुरुस्ती करून सर्वसामान्य ग्रामस्थांना सर्वच उपचार येथे उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले. विशेष म्हणजे गरोदर मातांसह बालकांच्या आरोग्यावर विशेष लक्ष देण्याचेही त्यांनी निर्देश दिले आहे. यामध्ये आशा सेविकांची मुख्य भूमिका असणार आहे. गरोदर मातांच्या आहारापासून तर त्यांच्या संपूर्ण वैद्यकीय तपासण्या आदींवर आशा सेविकांचे लक्ष राहणार आहे.
‘एनसीडी’ केंद्रांतर्गत असाध्य आजारांचे निदानकर्करोग, मधुमेह यासारख्या असाध्य आजारांच्या निदानासाठी जिल्हा स्तरावर एनसीडी केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. याच प्रकारचे केंद्र जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुरू करण्यात आले असून, यामध्ये असाध्य आजारांचे निदान करण्यात येणार आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वच सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्रामीण रुग्णांवर प्राथमिक उपचार पीएचसीतच होणे अपेक्षित आहे. याबाबत जिल्हा परिषद सीईओंनी तसे निर्देश दिले असून, गरोदर मातांकडे विशेष लक्ष देण्याचेही त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात जिल्ह्यातील त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचसीला भेटी देणे सुरू आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.