Russia-Ukraine war : युक्रेनमध्ये अकोल्यातील चार विद्यार्थी अडकले; पालकांची वाढली धडधड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2022 03:17 PM2022-02-26T15:17:25+5:302022-02-26T15:17:32+5:30

Russia-Ukraine war: कुणी हॉस्टेलमध्ये, तर कुणी बंकरमध्ये सुरक्षित असल्याची माहिती युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Russia-Ukraine war: Four Akola students stranded in Ukraine | Russia-Ukraine war : युक्रेनमध्ये अकोल्यातील चार विद्यार्थी अडकले; पालकांची वाढली धडधड

Russia-Ukraine war : युक्रेनमध्ये अकोल्यातील चार विद्यार्थी अडकले; पालकांची वाढली धडधड

Next

- प्रवीण खेते

अकोला : रशिया - युक्रेनच्या युद्धात भारतातील वीस हजारापेक्षा जास्त विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यात अकोल्यातील चार विद्यार्थांचा समावेश असून कुणी हॉस्टेलमध्ये, तर कुणी बंकरमध्ये सुरक्षित असल्याची माहिती युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

युक्रेन प्रांतातील किव्ह येथील परिस्थिती चिंताजनक असली, तरी लाव्हीवसह काही भागातील विद्यार्थांना पोलंडमार्गे भारतात आणण्याच्या हालचाली भारतीय दूतावासाकडून सुरू असल्याची माहिती येथील विद्यार्थाने ‘लोकमत’शी बोलताना दिली. एकंदरीतच युद्धात अडकलेल्या पाल्यांच्या चिंतेत अकोल्यातील पालकांचीही धडधड वाढली असून केंद्र शासनाने बचावकार्याला वेग देण्याची मागणी केली जात आहे.

 

आठ किलोमीटर पोलंडच्या दिशेने पायदळ प्रवास

आम्ही पोलंडच्या बॉर्डरपासून सुमारे आठ किलोमीटर दूर आहोत. लव्हीवमधून भारतीय दूतावासाच्या वाहनाद्वारे आम्ही पोलंडच्या दिशेने निघालो होतो. मात्र, पोलंड बॉर्डर काही तासांच्या अंतरावर असतानाच गडबड झाली. रस्त्यात वाहनांची लांबलचक रांग लागली असून, वाहतूक ठप्प झाल्याने आम्हाला पायदळ पोलंडच्या दिशेने जावे लागत आहे. पोलंड बॉर्डरवर चेकपोस्टवर तपासणी केल्यानंतर पुढचा प्रवास होणार असल्याची माहितीही मोहीत मालेकरने ‘लोकमत’शी बोलताना दिली.

परिस्थिती गंभीर, आम्ही अडकलोय बंकरमध्ये

युक्रेनमधील इतर ठिकाणांच्या तुलनेत राजधानी केव्हमध्ये परिस्थिती गंभीर आहे. भारतीय दूतावासाकडून अजून तरी आमच्यासाठी मदत पोहोचलेली नाही, मात्र त्यांनी विद्यार्थ्यांना बॅग पॅक करून तयार राहायला सांगितले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना बंकरमध्ये ठेवण्यात आले आहे. येथील परिस्थिती तणावपूर्ण असल्याचे एका विद्यार्थ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. काही विद्यार्थी अजूनही हॉस्टेलमध्येच आहेत, तर काही बंकरमध्ये सुखरूप असल्याचे एका विद्यार्थ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

विद्यार्थ्यांना पालकांची चिंता

पोलंडच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास घेतला, मात्र अकडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण दिसून येत आहे. काही ठिकाणी मोबाईलला रेंज मिळत नसल्याने त्यांचा पालकांशी संपर्क तुटत असल्याची माहिती दिली

 

काय म्हणतात पालक? 

माझी मुलगी युक्रेनची राजधानी कीव्ह येथील बोकोव्हिलिअम विद्यापीठात एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला आहे. सकाळीच मुलीशी संपर्क झाला असून ती सुरक्षित असल्याचे तिने सांगितले. भारतीय दूतावासाकडून त्यांना भारतात परतण्याच्या तयारीत राहण्यासाठी सांगितले आहे. आता भारत सरकार काय निर्णय घेते याकडे लक्ष लागलेले आहे.

- भगवान भालेराव, पालक

मुलासोबत नियमित संपर्क होत आहे. भारतीय दूतावासाकडून त्यांना लव्हीव येथून पोलंड बॉर्डरकडे नेत असल्याचे मुलाने सांगितले. पोलंडची सीमा आठ किलोमीटर दूर असतानाच आम्हाला पायदळ बॉर्डरच्या दिशेने वाटचाल करावे लागल्याचे मुलाने सांगितले. माझ्या मुलासोबतच इतरही विद्यार्थी लवकर मायदेशी परत यावे, हीच अपेक्षा आहे.

- प्रीती विजय मालेकर, पालक

माझा भाचा एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला असून युक्रेन येथील चेर्नव्हट्सी सीटीमध्ये आहे. विद्यापीठाद्वारे विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारतीय दूतावासाकडून विद्यार्थ्यांना रोमानियामार्गे भारतात आणले जात असल्याची माहिती माझ्या भाच्याने दिली. लवकरच इतर विद्यार्थ्यांनाही टप्प्याटप्प्याने भारतात आणण्याची तयारी सुरू असल्याचेही त्याने आम्हाला सांगितले. त्यामुळे मोठा धीर मिळाला आहे.

- डॉ. दाबीश खान, पालक

Web Title: Russia-Ukraine war: Four Akola students stranded in Ukraine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.