रशिया-युक्रेन युद्ध : रशियातील अकोलेकर विद्यार्थ्यांच्या पालकांचा जीव टांगणीला
By Atul.jaiswal | Published: February 25, 2022 12:06 PM2022-02-25T12:06:34+5:302022-02-25T12:15:13+5:30
Russia-Ukraine war: रशियातील विविध विद्यापीठांमध्ये अकोल्यातील अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत.
- अतुल जयस्वाल
अकोला : होणार होणार अशी अटकळ बांधली जात असलेल्या रशिया व युक्रेनदरम्यानच्या प्रत्यक्ष युद्धाला अखेर गुरुवारी तोंड फुटले. दोन देशांदरम्यानच्या या युद्धाला मोठे स्वरूप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रशियातील विविध विद्यापीठांमध्ये अकोल्यातील अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. आता युद्धाला सुरुवात झाल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांना चिंता लागून राहिली आहे. दरम्यान, रशियात शिक्षण घेत असलेल्या काही विद्यार्थ्यांसोबत ‘लोकमत’ने संपर्क साधला असता, सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, कानी पडणाऱ्या युद्धाच्या बातम्यांमुळे त्यांच्या पालकांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे.
विद्यार्थी म्हणतात, आम्ही सुरक्षित
स्मॉलेंक्स स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असलेल्या अभिषेक मोडक या एमबीबीएसच्या विद्यार्थ्यासोबत संपर्क साधला असता, तिकडे तूर्तास सर्व शांत असल्याचे त्याने सांगितले. या युनिव्हर्सिटीमध्ये अकोल्याचे १५ ते २० विद्यार्थी शिकत असून, ते सर्व सुखरूप आहेत. युक्रेनच्या सीमेपासून व युद्धक्षेत्रापासून स्मॉलेंक्स ५०० कि.मी. लांब असल्याने तूर्तास कोणताही धोका नाही. युनिव्हर्सिटी व्यवस्थापनाकडूनही सध्या कोणत्याही सूचना देण्यात आल्या नसल्याचे अभिषेकने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
माझा मुलगा अभिषेक मोडक हा रशियातील स्मॉलेंक्स शहरातील स्मॉलेंक्स स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाला आहे. त्याच्याशी रोजच मोबाइलवरून संपर्क होतो. तिकडे सर्व शांत असल्याचे तो सांगतो; परंतु हे ठिकाण युक्रेन सीमेपासून ५०० किलोमीटर अंतरावर असल्याने थोडी चिंता लागून राहते. दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या लाटेतही त्याच्या शिक्षणात अडथळा आला होता. आता युद्धाला तोंड फुटल्याने त्याचा परिणाम शिक्षणावर होऊ नये, असे वाटते.
- सुनील मोडक, पालक, अकोला
माझा मुलगा ओम मोडक हा रशियातील स्मॉलेंक्स शहरातील स्मॉलेंक्स स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाला आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यामुळे त्याच्याबाबत थोडी चिंता वाटते. बुधवारी सकाळीच त्याच्याशी मोबाइलवरून बोलणे झाले. त्याच्यासोबत अकोला, खामगाव, बुलडाणा येथील इतरही विद्यार्थी आहेत. काळजी करण्याचे काही कारण नसल्याचे त्याने सांगितल्याने दिलासा मिळाला आहे. दोन दिवसांपासून सतत टीव्हीवर युद्धाच्या बातम्यांकडेच लक्ष लागले आहे.
- विनायक मोडक, पालक, गोपालखेड
माझी मुलगी तेजस्विनी वजिरे ही रशियातील वोल्गो ग्रँट येथील विद्यापीठात एमबीबीएसच्या अंतिम वर्षाला शिकते आहे. सध्या युक्रेन-रशियादरम्यान युद्ध सुरू झाले आहे. त्यामुळे चिंंता वाटते; परंतु तेथील भारतीय विद्यार्थी सुरक्षित आहेत. मुलीने सुद्धा मला फोन करून काळजी करू नये. आम्ही सुरक्षित आहोत, असे सांगितले आहे. त्यामुळे आम्ही निवांत आहोत.
-भुवन भास्कर वजिरे, पालक, अकोला