पातूर (अकोला): सागवान तस्कराने वन विभागाच्या कर्मचार्यावर हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली. मुजावर पुरा येथे १८ फेब्रुवारी रोजी वन विभाग व पातूर पोलिसांनी संयु क्तपणे सागवानचे कटसाईज फर्निचर जप्त केले होते. जवळपास तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. एवढी मोठी कारवाई करूनसुद्धा एकाही आरोपीला अटक करण्यात आली नव्हती. दरम्यान,२१ फेब्रुवारी रोजी रेस्ट हाऊस रोडवर सागवानची वाहतूक होत असल्याची माहिती वन विभागाच्या दोन कर्मचार्यांना मिळाली. कर्मचार्यांनी सापळा रचला. त्यांना एक युवक हा सायकलवर सागवानचे चार नग घेऊन येत असताना दिसला. त्यांनी त्याला थांबण्यास सांगितले; मात्र त्याने कर्मचार्यांना मारहाण केली. त्याने दगडेही फेकले. त्यानंतर तो पळून जाण्यात यशस्वी झाला. या हल्लयात एक कर्मचारी जखमी झाला. कर्मचार्यांनी सायकल व सागवान जप्त केले. या सागवानची किंमत अंदाजे १४ हजार रुपये असल्याचे वन विभागाचे कर्मचार्यांनी सांगितले. त्यांनी पातूर पोलिस ठाण्यात धावही घेतली. मात्र याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.
सागवान तस्कराचा वन विभागाच्या कर्मचा-यावर हल्ला
By admin | Published: February 22, 2016 2:24 AM