संतोष येलकर
अकोला: राज्यकर्ते शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारे असले पाहिजे; नाहीतर शेतकऱ्यांच्या पिढीच नुकसान होते, असे सांगत ' काम करीत असताना शरद पवार साहेबांनी कधीही हस्तक्षेप केला नाही, एवढी मोकळीक दिली की आज परिस्थिती वेगळी झाली आहे ' असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी गुरुवारी येथे केले.
अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे आयोजित सहकार महर्षी डॉ. वा. रा. उपाख्य अण्णासाहेब कोरपे जन्मशताब्दी महोत्सव समारोप समारंभात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी केलेल्या या वक्तव्याने उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांसह पदाधिकारी व सहकार क्षेत्रातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. राजकारणात काम करताना संधी दिली की हस्तक्षेप करायचा नाही, ही भूमिका शरद पवार यांनी घेतली, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या हिताला बाधा येणार नाही आणि पुरोगामी चळवळीला बळकट करण्यासाठी काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, आमदार अमित झनक, आमदार किरण सरनाईक, आमदार नितीन देशमुख, डॉ. संतोष कोरपे, अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, रमेश हिंगणकर, महादेवराव भुईभार आदी उपस्थित होते.