आशिष गावंडे, अकाेला: युटयुब चॅनेलवर बारामती येथे योगेश सावंत नामक व्यक्तीने प्रतिक्रिया देतांना राज्यातील ब्राह्मण समाजाच्या हत्याकांडाची धमकी देत आक्षेपार्ह विधान केले. या विधानाची गंभीर दखल घेत गुरुवारी शहरातील सकल ब्राह्मण समाजाने जिल्हा पाेलिस अधीक्षक कार्यालयावर धडक देत पाेलिस प्रशासनाला निवेदन सादर केले. ब्राह्मण समाजा विषयी गरळ ओकणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपवुन टाकु असे आक्षेपार्ह विधान करणाऱ्या व्यक्तीमुळे समाजात भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. या धमकीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणत्याही समाजाच्या आंदोलनाला किंवा मागणीला ब्राह्मण समाजाने कधीही विरोध केलेला नाही. परंतु हा इसम जाणीवपुर्वक ब्राह्मण समाजाची बदनामी करीत असल्यामुळे समाज दडपणाखाली सापडला आहे. त्यामुळे संबंधित इसमा विरोधात गुन्हा दाखल करुन यामध्ये सहभागी असलेल्या इतर सर्व आरोपींचा शोध घेऊन नियमानुसार कारवाइ करण्याची मागणी सकल ब्राह्मण समाजाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.
मागणीचे निवेदन शहर पाेलिस उपअधीक्षक सतिष कुलकर्णी यांना देण्यात आले. यावेळी उदय महा, सिध्दार्थ शर्मा, डॉ.पार्थसारथी शुक्ल,डॉ.गिरीश नाईक, सुधीर देशपांडे, राजेश मिश्रा, गिरीश गोखले, कपिल रावदेव, निलेश देव, कुशल सेनाड, सौरभ भगत, संजय देशमुख, डॉ.राजू देशपांडे, देवेंद्र तिवारी, आनंद जहागीरदार, आशिष अमीन, माधव देशमुख, विनायकराव पांडे, गिरीश नानोटी,अशोक शर्मा, राधेश्याम शर्मा, अतुल पाटील, राकेश शर्मा, अॅड. विलास पाटील, सागर जोशी, मंजुषा घुटिकर, पल्लवी कुलकर्णी, नीलिमा ठकार यांसह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.