पारस : औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मे महिन्याचा पगार अद्याप मिळाला नसल्याने कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. याबाबत मुख्य अभियंत्यांना निवेदन देऊनही समस्या ‘जैसे थे’ असल्याने कंत्राटी कर्मचारी वैतागले आहेत. अधिकारी व कंत्राटदाराच्या साटेलोटे असल्यामुळेच कंत्राटी कामगारांचे प्रश्न दुर्लक्षित असल्याचा आरोप संघर्ष कंत्राटी कामगार समिती, औष्णिक विद्युत केंद्र पारस संघटनेचे अध्यक्ष सतीश तायडे यांनी केला आहे.
संघर्ष कंत्राटी कामगार समितीने मुख्य अभियंत्यांना कंत्राटी कामगारांच्या पगाराबाबत व समस्यांबाबत वेळोवेळी निवेदन देऊनही मुख्य अभियंत्यांचे दुर्लक्ष होत आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना अद्याप पगार मिळाला नसल्याने कर्मचारी संकटात सापडले आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त झालेले कंत्राटी कामगार पगार होत नसल्याने आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. याबाबत मंगळवार, दि.२२ जून २०२१ रोजी संघर्ष कंत्राटी कामगार समितीचे अध्यक्ष सतीश तायडे व पदाधिकाऱ्यांनी कामगारांच्या पगाराबाबत मुख्य अभियंता विठ्ठल खटारे यांच्याशी चर्चा केली असता त्यावेळी मुख्य अभियंत्यांनी कंत्राटदाराची पाठराखण केल्याचा आरोप संघर्ष कंत्राटी कामगार समितीने केला, तसेच उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोपही समितीने केला. कंत्राटी कामगारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघर्ष कंत्राटी कामगार समितीचे अध्यक्ष सतीश तायडे यांनी दिला आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडविण्याची मागणी समितीने केली आहे.
---------------------------
संघर्ष कंत्राटी कामगार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कामगारांच्या पगाराबाबत माझ्याशी चर्चा केली असून, मी कंत्राटदारांची बैठक बोलावून त्यांना कामगारांचे पगार दहा तारखेच्या आत करण्याचे सुचविले आहे.
विठ्ठल खटारे, मुख्य अभियंता, वीजनिर्मिती प्रकल्प, पारस