अकोला : कोरोनामुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. महामंडळाला कसेबसे करून कर्मचाऱ्यांचे पगार भागवावे लागत आहे. त्यातच इतर काही बाहेरील विभागांनीही देणी थकवल्यानेही आर्थिक संकटात भर पडली आहे. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून एसटी महामंडळाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनापूर्वी दररोज अकोला आगारातून १४०-१५० फेऱ्या व्हायच्या, कोरोनामध्ये त्या २०-४० वर आल्या. गेल्या तेरा दिवसांपासून कडक निर्बंधांमुळे तर त्या पूर्ण बंद आहेत. फक्त मालवाहतूक काही प्रमाणात सुरू आहे. उत्पन्नच नसेल तर पगार कसे भागवायचे? हा प्रश्न प्रशासनापुढे आहे. महामंडळातर्फे टपाल खात्याला सेवा दिली जाते. त्याशिवाय खासगी मालवाहतूकही केली जाते. याव्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी पास, विद्यार्थिनींचा मोफत प्रवास इत्यादी सवलतीही दिल्या जातात. निवडणुकांसाठी गाड्यांचा वापर, स्थानकातील व्यावसायिकांकडून मिळणारे भाडे, मुंबईला बेस्ट उपक्रमासाठी सेवा देणे या माध्यमातून बरेच उत्पन्न एसटीला मिळते. लॉकडाऊन काळात या व्यवसायाने एसटीला मोठा आधार दिला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना वॉरंटसाठी प्रवास दिल्यानेही एसटीच्या उत्पन्नात भर पडते. पण यातील बरीच शासकीय देणी सध्या प्रलंबित आहेत. टपाल, पोलीस खाते, बेस्ट, म्हाडासाठी प्रवासी सेवा, ज्येष्ठ नागरिकांना सवलत आदी येणी मात्र रखडत आहेत. आर्थिक टंचाईच्या काळात हे पैसे मिळणे एसटीसाठी महत्त्वाचे आहे.
जिल्ह्यातील एकूण आगार- ५
एकूण कर्मचारी - १३५०
सध्याचे रोजचे प्रवासी वाहतुकीतून उत्पन्न - ०
..तर आर्थिक फटका बसणार नाही!
अनावश्यक फेऱ्या न चालविता ज्या ठिकाणी आवश्यक आहे तेथेच फेऱ्या चालवाव्या, जेणेकरून महामंडळाला आणखी आर्थिक फटका बसणार नाही.
- रूपम वाघमारे, विभागीय सचिव, एसटी संघटना
कर्मचारी आर्थिक अडचणीत
काही दिवसांपासून ड्यूटी बंद असल्या तरी एसटीने वेतन थांबवलेले नाही. गरजेनुसार आम्हीदेखील ड्यूटीवर हजर राहत आहोत. महामंडळाचे उत्पन्न थांबले तर पगार कसे होणार याची चिंता कर्मचाऱ्यांनाही लागून राहिली आहे.
- एसटी कर्मचारी
मागील दोन महिन्यांपासून एसटी बसेस बंद आहे. एसटीची चाके थांबली असली तरी महामंडळाने कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडलेले नाही. लाॅकडाऊन संपून एसटी सेवा पुन्हा सुरू होण्याची आम्हाला प्रतीक्षा आहे.
- एसटी कर्मचारी
एसटी महामंडळाकडून मोठ्या प्रमाणात सवलती देण्यात येतात, या सवलतींचे पैसे विविध विभागांकडून प्राप्त झाल्यास महामंडळाला अडचण येणार नाही. सध्याची परिस्थिती कठीण असली तरी कर्मचारी सुरक्षित ठेवण्यात महामंडळाने प्राधान्य दिले आहे.
- एसटी कर्मचारी