जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश पायदळी तुडविले
अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाकाली वाइन बार येथे संचारबंदीतही विदेशी दारूची धूम धडाक्यात विक्री सुरू असताना दहशतवादविरोधी कक्षाने रविवारी सायंकाळी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. यावेळी ७ ते ८ ग्राहक बारमधून फरार होण्यात यशस्वी झाले.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असताना शासनाने याची गंभीर दखल घेत विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांनी रविवारी कडक संचारबंदी लागू केली आहे. मात्र महाकाली वाइन बारचे मालक सचिन उर्फ बबलू अशोक सिंह रघुवंशी राहणार विद्यानगर व डबकी रोड येथील रहिवासी गौरव संतोष ठाकरे यांनी महाकाली वाइन बार संचारबंदीतही सुरू ठेऊन या बारमधून रविवारी विदेशी दारूची धडाक्यात विक्री सुरू केली. या प्रकाराची माहिती दहशतवाद विरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळताच त्यांनी पथकासह छापेमारी केली. या ठिकाणावरून विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाकाली वाइन बारमधून संचारबंदी किंवा दारू विक्रीला बंदी असतानाही धूम धडाक्यात विक्री सुरू असताना यापूर्वी तीन ते चार वेळा मोठी कारवाई झालेली आहे; मात्र त्यानंतरही या वाइन बारमधून मोठ्या प्रमाणात दारू विक्री सुरूच असल्याचे रविवारी पुन्हा एकदा उघड झाले आहे.
उत्पादन शुल्क विभाग झोपेत
कोरोनाचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्य ओळखून संचारबंदी लागू केली आहे; मात्र असे असतानाही महाकाली वाइन बार येथून मोठ्या जोमात दारू विक्री सुरू असताना याची माहिती मात्र उत्पादन शुल्क विभागाला नव्हती. यापूर्वीही तीन ते चार वेळा छापेमारी झाली; मात्र उत्पादन शुल्क विभाग झोपत होता. यावरून उत्पादन शुल्क विभागाचे या अवैध दारू विक्रीला पाठबळ असल्याची चर्चा होती.