लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला जिल्ह्यातील किरकोळ मद्य विक्री, वाइन शॉप बिअर शॉपी, देशी दारू किरकोळ विक्री, ठोक विक्रेते या दुकानांचे व्यवहार बुधवार, ६ मेपासून अटी व शर्तींच्या अधीन राहून सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला आहे. तथापि, अकोला महापालिका क्षेत्र मात्र यातून वगळण्यात आले आहे.ग्रामीण भागातील सर्व घाऊक मद्य विक्रीची दुकाने सुरू होतील. नगरपालिका क्षेत्रातील सर्व घाऊक मद्य विक्रेत्यांचे व्यवहार सुरू करता येतील; मात्र सायंकाळी ५ वाजतानंतर व्यवहार सुरू ठेवता येणार नाहीत. तसेच घाऊक विक्रेत्यांनी ५० टक्के मनुष्यबळावर काम करून ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा कसोशीने पालन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोला महापालिका क्षेत्र वगळून किरकोळ मद्य विक्री अनुज्ञपत्यांना केवळ सीलबंद मद्य विक्री करण्यास परवानगी राहील.अशा दुकानासमोर पाचपेक्षा अधिक ग्राहक एका वेळी असता कामा नये, दोन ग्राहकांमध्ये किमान सहा फुटाचे अंतर असणे अनिवार्य आहे. त्यासाठी प्रत्येक सहा फुटावर वर्तुळ आखून घेण्याच्या तसेच ग्राहकांसाठी हॅण्ड सॅनिटायझर मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा आदेश आहे. किरकोळ विदेशी मद्य विक्रीची दुकाने सकाळी १० ते दुपारी २ वाजतापर्यंत सुरू ठेवता येतील. किरकोळ देशी मद्य विक्री सकाळी ८ ते दुपारी २ वाजतापर्यंत सुरू ठेवता येतील.
अकोला मनपा क्षेत्र वगळून आजपासून मद्य विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 9:50 AM