जनता भाजी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे तसेच सदर ठिकाणचे व्यवसायिक हे कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन करीत असल्याचे निर्दशनात आल्याने जनता बाजार येथून कोरोनाचा फार मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने या बाजरावर बंदी घातल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. जनता भाजी बाजार येथील होलसेल व किरकोळ भाजीपाला व फळेविक्रीस २३ एप्रिलपासून २ मे २०२१ पर्यंत पूर्णत: बंदी घालण्यात आली होती. आता जिल्हाधिकारी यांचे ३० एप्रिल राेजी लाॅकडाऊनसंदर्भात नव्याने आदेश निर्गमित झाले आहेत. त्या अनुषंगाने मनपा आयुक्तांनी जनता भाजी बाजार १५ मेपर्यंत बंद राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
असा आहे आयुक्तांचा आदेश...
1. जनता भाजी बाजार येथील होलसेल व किरकोळ भाजीपाला व फळेविक्रीस 15 मे, 2021 पर्यंत पूर्णत: बंदी राहील.
2. जनता बाजार येथील किराणाची दुकाने ही सकाळी 7 ते 11 वाजे पर्यंत व कृषीसेवा केंद्राची दुकाने ही सकाळी 7 ते दुपारी 3 वाजे पर्यंत सुरु राहतील. या व्यतिरिक्त कोणतीही दुकाने सुरु राहणार नाहीत.
3. भाजीपाला व फळ हर्रासी करण्याकरिता महात्मा फुले भाजी बाजार - वाशिम रोड व सावित्रीबाई ज्योतीबा फुले भाजी बाजार - लोणी रोड या ठिकाणी व्यवसाय करण्यास मुभा राहील.
4. महात्मा फुले भाजी बाजार - वाशिम रोड व सावित्रीबाई ज्योतीबा फुले भाजी बाजार - लोणी रोड या ठिकाणी घाऊक व्यवसाय करण्याकरिता आवश्यक व्यवस्था असल्यामुळे पर्यायी जागा म्हणून जनता भाजी बाजाराचा यापुढे हर्रासीकरिता वापर करता येणार नाही.
5. जनता भाजीबाजार, जुना भाजी बाजार, जैन मंदिर रोड, ओपन थिएटर ते फतेह अली चौक येथे किरकोळ भाजीपाला विक्री करणारे व्यवसायिक यांना भाटे क्लब प्रांगण येथेच व्यवसाय करणे बंधनकारक राहील.
6. जनता भाजीबाजार, जुना भाजी बाजार, जैन मंदिर रोड, ओपन थिएटर ते फतेह अली चौक येथे किरकोळ फळ विक्री करणारे व्यवसायिक यांना गांधी जवाहर बाग लगत निशांत टॉवरसमोरील मुख्य रस्त्यावर व्यवसाय करणे बंधनकारक राहील.
7. किरकोळ भाजीपाला/फळ विक्रीकरिता व्यवसायिक यांना परवानगी दिलेल्या जागेत कोरोना नियमांचे पालन करुन आपला व्यवसाय करावा. दिलेल्या जागेव्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये व्यवसाय करीत असल्याचे आढळून आल्यास प्रशासनाकडून अशा व्यावसायिकांवर कोराना नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे गृहीत धरुन कठोर कारवाई करण्यात येईल.
8. उपरोक्त व्यवसायधारकांना व्यवसाय करताना सोशल डिस्टंसिंग तसेच मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील.