- सदानंद सिरसाटअकोला : पेरणीपूर्वी जूनच्या सुरुवातीला कंपन्यांनी केलेल्या साठ्यातून घेतलेले बीटी कापूस बियाण्यांचे नमुने तपासणीत निकृष्ट निघाले. तिन्ही कंपन्यांच्या बियाण्यांच्या त्या लॉटमध्ये असलेल्या १८०८१ पॅकेट्स बियाण्यांची विक्री राज्यातील शेतकऱ्यांना झाली. ९ हजार ४० एकर शेतीवर त्या बियाण्यांची पेरणी झाली असून, त्या क्षेत्रावर बोंडअळीचा धोका घोंगावत आहे. विक्री झालेल्या सर्वाधिक पॅकेट्स सत्त्या अॅग्रोचे ७४८५, राशी सीड्सचे ६८१६, तर तुलसी सीड्सच्या ३७८० पॅकेट्सचा समावेश आहे.गेल्यावर्षी झालेल्या बोंडअळीच्या हल्ल्याने कापूस उत्पादक मेटाकुटीस आला असताना यावर्षीही हजारो एकरावर बोंडअळीला पोषक बीटी बियाण्यांची पेरणी झाल्याचे पुढे येत आहे. चालू वर्षात गुलाबी बोंडअळीचा हल्ला रोखण्यासाठी कृषी विभागाने बियाणे नमुने तपासणीची धडक मोहीम सुरू केली. बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. अहवालात बीटी कापूस बियाण्यांत (नॉन-बीटी) रेफ्युजीचे प्रमाण ठरल्यापेक्षा कमी आढळले, तर दोन कंपन्यांच्या बियाण्यांत बीटी जिन्सचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा आहे. बीटी कापूस बियाण्यासोबत दिले जाणारे रेफ्युजी बियाणे शंभर टक्के नॉन-बिटी द्यावेच लागते. राशी सीड्सच्या आरसीएच-१३८ वाणाच्या लॉट क्रमांक-७५२५३ मध्ये बीटी बियाणे असल्याचे पुढे आले. त्यामध्ये बीजी-१ चे प्रमाण नऊ टक्के तर बीजी-२ चे प्रमाण ३२ टक्के आहे. नमुने घेतल्याच्या दिवशी म्हणजे ६ जून रोजी या कंपनीचा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात साठा होता. त्यामुळे या बियाण्यांतून येणाºया पिकावर बोंडअळीची शक्यता वाढलेली आहे.कापूस बियाण्यात बीटी जिन्सचे प्रमाण ९० ते ९५ टक्के असणे आवश्यक आहे. तुलसी सीड्सच्या तुलसी -११८ बीजी-२ वाणाच्या लॉट क्रमांक ४५२२० मध्ये ते प्रमाण केवळ ५७ टक्के आढळले आहे. श्री सत्त्या अॅग्रोबायोटेकच्या एसएससीएच-५५५ बीजी-२ या वाणाच्या लॉट क्रमांक ३०३-३१०४५ मध्ये बीजी-२ जिन्सचे प्रमाण केवळ ३७ टक्के आहे. याच कंपनीच्या ४५ एसएस-३३ बीजी-२ वाणाच्या लॉट क्रमांक ३०३-३२६३९ मध्ये बीजी-२ जिन्सचे प्रमाण ४९ टक्केच आहे. एसएससीएच-३३३ बीजी-२ या वाणाच्या लॉट क्रमांक ३०३-३११०८ मध्ये बीजी-२ जिन्सचे प्रमाण ४६ टक्केच आहे.