बार्शीकाळी : भारीप बहुजन महासंघाचे पहिले आमदार, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा गोर बंजारा समाजाचे नेते मखराम पवार यांचे रविवारी (८) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. मुंबई येथील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला. विक्रीकर अधिकारी ते यशस्वी राजकारणी असा त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा आलेख राहिला आहे. मितभाषी पण सर्वांशी मिळून वागणारा नेता, गोरगरिबांच्या उत्थानासाठी अहोरात्र झटणारा नेता म्हणूनही ते सर्वपरिचित होते. मखाराम पवार यांचा बोलण्यापेक्षा त्यांचा कामावर अधिक भर होता. बहुजनांची मोट बांधणारे मखाराम पावार हे मितभाषी असले, तरी स्पष्टवक्ते होते.
राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री मखाराम पवार यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या जन्मगावी लोहगड (ता. बार्शीटाकळी) येथे झाले. पुढे त्यांनी बी.कॉमची पदवी, त्यानंतर बी.जी.एल.ची कायद्याची पदावी संपादन केली. अकोला जिल्हा परिषदेत उपलेखापाल या पदावर कार्यरत असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर अधिकारी वर्ग-२ च्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यानंतर विक्रीकर अधिकारी, पुढे सहायक विक्रीकर आयुक्त म्हणून सेवा दिली. दि. ३१ डिसेंबर रोजी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून राजकारणात प्रवेश केला.
सन १९९० मध्ये मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून विजय झाले. जुलै १९९८ ते २००१ पर्यंत त्यांनी महाराष्ट्र राज्याचे व्यापार व वाणिज्य, दारूबंदी प्रचार कार्य, खनिकर्म व पशुसंवर्धन खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून कार्य केले. मंत्रिपदाच्या कार्यकाळात नागपूर येथे महाराष्ट्र पशु व मत्स विज्ञान विद्यापीठाची स्थापना केली. मार्च १९९०मध्ये आमदार म्हणून भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्याने निवडून आल्यानंतर त्यांनी जिल्हा स्तरावर बहुजन महासंघ या राजकीय पक्षाची उभारणी केली. १९९१ मध्ये अकोला जि. प. निवडणूक झाली असता भरघोस यश मिळाले. सप्टेंबर १९९९च्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे खासदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर पक्षाचे रजिस्ट्रेशन हे ‘भारीप बहुजन महासंघ’ करण्यात आले. ॲड. आंबेडकर यांच्याशी मतभेद झाल्यानंतर २००१ मध्ये त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर १९ जून २००१ रोजी त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले आहे. आजरोजी ते कॉंग्रेसचे ‘पक्ष प्रवक्ता’ म्हणून कार्यरत होते.
शिक्षणावर अधिक भर!
शिक्षणामुळेच खरी प्रगती होऊ शकते, ही त्यांची धारणा होती. त्यामुळेच त्यांनी शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून प्रचंड परिश्रम घेतले. जनता ज्ञाानोपासक मंडळ या शैक्षणिक संस्थेची स्थापना करून संस्थेमार्फत लोहगड येथे बंडू नाईक विद्यालय सुरू केले. आज रोजी या संस्थेचे दोन महाविद्यालये, दोन कनिष्ठ महाविद्यालये, पाच विद्यालये, एक आश्रम शाळा जिल्ह्यात चालविल्या जात आहेत.
आज लोहगड येथे अंत्यसंस्कार
माजी कॅबिनेटमंत्री मखराम पवार यांचे मुंबईत निधन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर सोमवार, दि. ९ ऑगस्ट रोजी लोहगड येथे त्यांच्या मूळ गावी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी शासनाचे निर्बंध पाळून बंजारा समाजाचे नेते, राजकीय पदाधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी व समाजबांधव उपस्थिती राहणार आहे.