अकोला: बोले तो, बंब बंब बोल रे..ओम नम: शिवाय.. बंब बंब भोले.. या जयघोषात अखेरच्या श्रावण सोमवारी पालखी व कावड यात्रा निघाली. शिवभक्त व कावडधारींचा उत्साह ओसंडून वाहत होता. परंतु, कावड यात्रेत प्रथमच पोलीस प्रशासनाने डीजे वाजविण्यावर बंदी घातल्याने शिवभक्त मंडळींचा हिरमोड झाला. शहरात प्रथमच जल्लोषाविना पालखी व कावड यात्रा निघाली. बॅन्ड बाजा, डीजेची साथसंगत नसल्याने शिवभक्त मंडळांनी जलाभिषेकाचा कार्यक्रम आवरता घेतला. दरवर्षी डीजे, बॅन्डबाजावर थिरकणारे शिवभक्त यंदाच्या कावड उत्सवामध्ये दिसून आले नाहीत. परंतु खांद्यांवर पालखी घेऊन आलेल्या शिवभक्त मंडळांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये पूर्वीसारखाच उत्साह कायम होता. लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वच कावड यात्रेत उत्साहाने सहभागी झाले होते. यंदाच्या कावड यात्रेत बालशिवभक्तांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. महादेव, विठ्ठल-रुक्मिणी, गजानन महाराज, आई तुळजा भवानी आदींचे आकर्षक देखावे पालखीवर उभारून शिवभक्त मंडळांचे कार्यकर्ते रविवारी सायंकाळीच गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे पवित्र जल आणण्यासाठी गेले होते. सोमवारी पहाटेपासूनच लहान पालख्या कावड घेऊन शहराकडे मार्गक्रमण करायला लागल्या. सकाळी १0 वाजताच्या सुमारास शहरातील जय बाभळेश्वर शिवभक्त मंडळ, राजराजेश्वर शिवभक्त मंडळ, ओंकारेश्वर शिवभक्त मंडळ, माणकेश्वर शिवभक्त मंडळ, आई तुळजा भवानी शिवभक्त मंडळ आदी मोठय़ा पालख्यांचे शहरात आगमन सुरू झाले. पालखीतील शिवभक्तांचे ठिकठिकाणी भाविकांच्यावतीने स्वागत करण्यात येत होते. अत्यंत शांततेच्या वातावरणात पालखी व कावडधारी राजराजेश्वर मंदिराकडे जाऊन राजराजेश्वराला जलाभिषेक करून बाहेर पडत होते. कावडयात्रा उत्सव पाहण्यासाठी शहरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होते. टिळक रोड, गांधी रोड, कोतवाली चौक ते जय हिंद चौक आणि राजराजेश्वर मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. शिवभक्तांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी सामाजिक संघटना, राजकीय पक्षांच्यावतीने प्रसाद, खिचडी, केळी, पाणी वाटपाचे स्टॉल लावण्यात आले होते.
भाजपतर्फे मानाच्या पालख्यांचे पूजन
भाजपच्यावतीने जय हिंद चौकामध्ये मानाच्या राजराजेश्वर पालखी, जागेश्वर पालखी, ओंकारेश्वर पालखीचे स्वागत करण्यात आले. खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, ज्येष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल, माजी महापौर सुमनताई गावंडे, किशोर मांगटे पाटील, गिरीश जोशी, नगरसेवक सतीश ढगे यांनी राजराजेश्वराच्या पालखीचे विधिवत पूजन केले. यावेळी शिवभक्तांना भाजपच्यावतीने केळींचे वितरण करण्यात आले.