अकोला: मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एकमेव व्हीआरडीएल लॅब आहे. चाचणीसाठी येणाऱ्या नमुन्यांची संख्या वेगाने वाढल्याने लॅबवर अतिरिक्त ताण वाढला आहे. त्यामुळे जवळपास तीन दिवसांच्या नमुन्यांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
कोविड चाचणीसाठी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व्हीआरडीएल ही एकमेव लॅब आहे. आधीच लॅबमध्ये पर्याप्त मनुष्यबळ नसल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. अशातच मागील पंधरा दिवासांपासून कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीचे नमुने संकलनाचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी दररोज क्षमतेपेक्षा जास्त नमुने चाचणीसाठी व्हीआरडीएल लॅबमध्ये येत आहेत. परिणामी लॅबवरील ताण वाढला आहे. या परिस्थितीतही येथील कर्मचारी सुटी न घेता रात्रंदिवस अहवाल तयार करण्याचे कार्य करीत आहेत.
तपासणीसाठी दररोज अडीच हजार नमुने
व्हीआरडीएल लॅबमध्ये दररोज जास्तीत-जास्त १८०० पर्यंत नमुन्यांची चाचणी शक्य आहे. मात्र, मागील पंधरा दिवसांपासून लॅबमध्ये चाचणीसाठी दोन ते अडीच हजार नमुने येत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. क्षमतेपेक्षा जास्त नमुने चाचणीसाठी येत असल्याने प्रलंबित अहवालांची संख्या वाढली आहे.
कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम
लॅबमध्ये चाचण्यांचा ताण वाढला आहे. त्याचा परिणाम लॅबमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर पडत आहे. ही बाब लक्षात घेता येथे पर्याप्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची गरज आहे.