अकाेला : शहरात काेराेनाचा प्रादुर्भाव झालेल्या भागात गुरुवारी फिरत्या मोबाइल व्हॅनद्वारे हायरिस्कमधील तब्बल १०१ संशयितांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. तसेच भरतिया रुग्णालयात १६५ जणांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
संसर्गजन्य काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सक्रिय झाली आहे. शहरातील पूर्व व दक्षिण झाेन काेराेनाचे हाॅटस्पाॅट ठरल्याचे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील हायरिस्कमधील व्यक्ती काेराेना चाचणीसाठी पुढाकार घेत नसल्यामुळे हायरिस्कमधील व्यक्तींच्या परिसरात किंवा घरी जाऊन स्वॅब घेण्यासाठी मनपाच्या वैद्यकीय आराेग्य विभागाने दाेन फिरत्या व्हॅनद्वारे स्वॅब जमा करण्याचे काम सुरू केले आहे. गुरुवारी पूर्व झाेनमधील कृषीनगर येथून ७० व दक्षिण झाेनमधील सिंधी कॅम्प येथून ३१ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. तसेच भरतिया रुग्णालयात १६५ व्यक्तींचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविले आहेत.