लोहारा(अकोला) : रेती घाटांचा लिलाव झाला नसतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. डोंगरगाव येथील मद नदीच्या पात्रात १० ते १५ फुटापर्यंत खड्डे खोदण्यात आले आहेत. या खड्याची दरड कोसळून एका मजुराचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एक मजूर किरकोळ जखमी झाला. ही घटना ८ मार्च रोजी घडली. अक्षय पंजाबराव दामले रा.डोंगरगाव असे मृतकाचे नाव आहे.लोहारा, डोंगरगाव, कवठा येथील मन नदी पात्रात तर काझिखेड , मोखा,हाता, अंदुरा या गावातील पुर्णा नदिपात्रात मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन सुरू आहे. ८ मार्च रोजी डोगरगांव येथे अकुश पटोकार रा. झुरळ यांच्या मालकीचे ट्रँक्टरकरीता मन नदीपात्रात नदीकाठावर रेती खोदत असताना २० ते २५ फुट ऊंच रेतीची दरड कोसळली. या दरडखाली अक्षय पंजाबराव दामले रा.डोंगरगांव मूळ गाव (निंबोरा ता. तेल्हारा) याचा दबून जागीच मृत्यु झाला तर गजानन सिरसाट रा. देगांवमाणकी हा मजुर किरकोळ जखमी झाला. अक्षय रेती चोरीचा बळी ठरला असुन याला जबाबदार महसुल विभागाचे तलाठी , अधिकाऱ्यांवर व ट्रॅक्टर मालकावर कारवाईची मागणी अक्षयच्या नातेवाईकांनी केली आहे. कारवाई होईपर्यंत अक्षयचे प्रेत गावातुन न हलविण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला असुन उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतिश पाटील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. या घटनेनंतर उपविभागीय अधिकारी रमेश पवार यांनी पोलीस स्टेशन उरळ येथे जाऊन घटनेची माहीती घेऊन दोषीवर कारवाईची सूचना केली. यापूर्वीही दोन वषार्पुर्वी मननदीपात्रात लोहारा येथे रेतीची दरड कोसळुन गोकुळ कैलास नरळे रा. मानेगांव या मजुराचा दरडखाली दबुन मृत्यु झाला होता.(वार्ताहर)
रेतीची दरड कोसळून मजूर ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 4:56 PM