खेट्री: पातूर तालुक्यातील अति दुर्गम भागात असलेल्या पांढुर्णा येथील पत्रकार अमोल सुखदेव सोनोने, यांच्यावर रेती माफियांनी हल्ला केल्याची घटना सोमवारी १८ जानेवारी रोजी घडली आहे. अंधारसांगवी परिसरातील निर्गुणा नदीपात्रातून रेतीचे उत्खनन करून अवैध वाहतूक सुरू असल्याचे वृत्त ‘दैनिक लोकमत’ने १७ जानेवारी रोजीच्या अंकात प्रकाशित करताच परिसरातील रेती माफियांचे पित्त खवळले आणि पत्रकार अमोल सोनोने पांढुर्णा मळसूर फाट्यावर १८ जानेवारी रोजीच्या सकाळी वृताची पार्सल आणण्यासाठी गेले असता, आलेगाव येथील रेती माफिया तिघांनी अमोल सोनोने यांना वस्तरा व काठीने मारहाण केली व जातीवाचक अश्लील शिवीगाळ केली. या हल्ल्यामध्ये पत्रकार अमोल सोनोने जखमी झाले. अमोल सोनोने यांनी थेट चान्नी पोलीस स्टेशन गाठले, पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ यांनी जखमी अमोल सोनोने याला चतारी ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी पाठविले. उपचार केल्यानंतर अमोल सोनोने यांच्या फिर्यादीवरून चान्नी पोलिसांनी ॲट्रॉसिटी ॲक्ट व भादविच्या ३२४, ५०६ ,५०४ ,३४, कलमान्वये आलेगाव येथील आरोपी सचिन करपे, रामेश्वर डाखोरे, आकाश मुळे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तत्काळ अटक केली आहे.
एका तासात केली तिघांना अटक
पत्रकार अमोल सोनोने यांच्यावर हल्ला केल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने व त्यांच्या फिर्यादीवरून ठाणेदार राहुल वाघ यांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल घेऊन एका तासात तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
रेती माफियांची मुजोरी वाढली
पातूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रेती माफियांची मुजोरी वाढली आहे. रेती माफियांवर कुणाचाही वचक नसल्याने, पत्रकार अमोल सोनोने यांच्यावर हल्ला केल्याचे समजते.