-------------------------------
वरूर जळउका येथे महिलांना मार्गदर्शन
वरुर जवूळका : वरुर येथील महिला बचत गटांनी महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात महिला बचत गटांकडून विविध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच महिला सक्षमीकरणासाठी महिलांना विविध योजनेबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुजाता घनबहादुर होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेघा घनबहादुर यांनी केले. कार्यक्रमामध्ये हगणदारीमुक्त गाव अभियानविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन शीतल घुगे यांनी, तर आभार मेघा घनबहादुर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरला वानखडे, सरोज पाचपोहे, जिजाबाई घनबहादुर, रिता दारोकार, अपर्णा घनबहादुर, संगीता चादने, संगीता वानखडे, उषा घनबहादुर, शारदा घनबहादुर, सुषमा गवई, संगीता घनबहादुर, जयश्री ओखारे, मंगला नायसे आदींनी परिश्रम घेतले. (फोटो)
-----------------------------------------------------
बाळापूर तालुक्यात ३१७ हेक्टरवर उन्हाळी पेरणी
बाळापूर : गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने विहिरी, प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे रब्बी हंगामात तालुक्यातील उन्हाळी पिकाच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. तालुक्यात तब्बल ३१७ हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी केली असून, पोषक वातावरणामुळे पिके शेतात डोलत आहेत.
----------------------------------------------
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतित
बार्शीटाकळी : तालुक्यात यंदा रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी गहू पिकाला पसंती दिली आहे. सद्यस्थितीत गव्हाचे पीक काढणीला आले असून, शेतकरी कामात व्यस्त आहे. गत दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतित सापडले आहेत.
----------------------------------------
दहावी, बारावी परीक्षांची तयारी
अकोट : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या काळातही विद्यार्थी परीक्षेची तयारी करताना दिसून येत आहेत.
---------------------
बाळापूर तालुक्यात रेतीची अवैध वाहतूक
बाळापूर : तालुक्यात रेतीची अवैध वाहतूक सुरू असून, याकडे महसूल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे. तसेच रेतीच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
------------------------
मास्क वापराकडे दुर्लक्ष; धोका वाढला!
मूर्तिजापूर : तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला असून, दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या त्रिसूत्रीचे नागरिकांकडून पालन होत नसल्याचे चित्र आहे. मास्क वापराकडेही दुर्लक्ष होत धोका वाढला आहे.
-------------------------------
वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान
बोरगाव मंजू : परिसरातील म्हातोडी, घूसर, दोनवाडा, घुसरवाडी शिवारात वन्य प्राणी पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. रोहींचा कळप रात्रंदिवस पिकामध्ये मुक्त संचार करीत असल्याने पिकांचे नुकसान हाेत आहे.
---------------------------------------
अकोट शहरात माठ विक्रीमध्ये वाढ
अकोट : जिल्ह्यात उन्हाचा पारा चढत असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्यात थंड पाण्याची गरज भासते. नागरिकांची गरज लक्षात घेता अकोट शहरासह ग्रामीण भागात माठ विक्रीची दुकाने लागली आहेत. १०० ते १२० रुपयांपर्यंत माठ मिळत आहे.
----------------------------------
गावरान आंब्याचा गोडवा हरवला
पांढूर्णा : अवकाळी पावसाने आंब्याचा मोहर खाली पडल्यामुळे यंदा गावरान आंब्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावरान आंब्याचा गोडवा नागरिकांना चाखायला मिळणार नसल्याचे चित्र आहे.
--------------------------------------------------