बोरगाव मंजू: स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सांगळुद बु. गावात गत काही दिवसांपासून अवैध दारू विक्री, गुटखा विक्री सर्रास सुरू असल्याने नागरिकांसह महिला त्रस्त झाल्या आहेत. त्यामुळे गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी सरपंच शीतल रणजित काळे यांच्या अध्यक्षतेखाली दि. २ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाइन ग्रामसभेत ठराव पारित केला आहे. तसेच सरपंचासह ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन ठाणेदार सुनील सोळंके यांना निवेदन देऊन अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सांगळूद येथे गत अनेक दिवसांपासून अवैध देशी दारू, अवैध गुटखा विक्री हा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अनेक युवक व्यसनाधीन होऊन, त्यांच्या कुटुंबात वाद विवाद वाढले आहेत. तसेच कुटुंब कलह वाढल्याने त्यांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होत आहे. ग्रामस्थांनी एकत्रित येऊन गावांतील ग्रामसभेत अवैध धंदे बंद करण्याचा ठराव पारित केला. दरम्यान, ठाणेदार सुनील सोळंके यांना निवेदन देऊन गावातील अवैध धंदे बंद करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. निवेदन देताना उपसरपंच कविता राक्षसकर, शीतल नीलेश काळे, रेखा तायडे, अश्विनी भगत, उत्तमराव टाकसाळे, अखिल भारतीय छावा संघटनेचे रणजित काळे, महेंद्र भगत, नीलेश काळे, हरिदास तायडे, दिलीप भगत, प्रभाकर राक्षसकर उपस्थित होते.
-----------
पाच हजार दंड होणार!
गावांत कोणी अवैध दारू विक्री, गुटखा विक्री इतर अवैध धंदे करताना आढल्यास त्याला ५ हजार रुपये दंड द्यावा, असेही ग्रामसभेत मंजूर करण्यात आले आहे. दरम्यान, ह्या अगोदर ग्रामपंचायत मासिक सभेत दि. १४ जुलै रोजी सरपंच शीतल रणजित काळे यांच्या अध्यक्षतेखालीसुद्धा याबाबत ठराव घेण्यात आला.