अकोला: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ भरती असलेल्या एका महिला रुग्णाला रक्ताची गरज भासल्यानंतर रक्ताच्या शोधार्थ असलेल्या तिच्या सुनेकडे या रुग्णालयातीलच सफाई कामगाराने चक्क शरीरसुखाची मागणी केल्याचा माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार शुक्रवार, ४ मे रोजी दुपारी घडला. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसाकडे चौकीत तोंडी तक्रार दिली असून, पुढील प्रक्रिया सुरू आहे. रुग्णालय प्रशासनानेही सदर सफाई कर्मचाऱ्यास समज देऊन सोडून दिले.केवळ अकोलाच नव्हे तर लगतच्या जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांसाठी येथील सर्वोपचार रुग्णालय आधारवड ठरले आहे; परंतु रुग्णालयात रुग्णांच्या नशिबी हेलपाटेच येतात. मोफत उपचार मिळतात म्हणून गरीब वर्गातील रुग्ण मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात. रुग्णालयात दाखल रुग्णांना रक्ताची गरज भासल्यास त्यांच्यासाठी शासकीय रक्तपेढी आहे; परंतु या ठिकाणी अनेकांना रक्त मिळत नाही. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना रक्त मिळविण्यासाठी वणवण भटकावे लागते. या अगतिकतेचा फायदा रुग्णालयात सक्रिय दलाल उचलतात. असाच काहीसा प्रकार शुक्रवारी दुपारच्या सुमारास एका महिलेसोबत घडला. सदर महिलेची सासू रुग्णालयाच्या अस्थिव्यंगशास्त्र विभागात वार्ड क्र. १७ मध्ये उपचारार्थ भरती आहे. तिच्या सोबत तिचा मुलगा व सून आहे. या महिलेला रक्ताची गरज भासल्यानंतर तिच्या सुनेने रक्त मिळविण्यासाठी रुग्णालयात प्रयत्न केले. तिने रुग्णालयातील एका सफाई कामगाराकडे रक्ताबाबत विचारणा केली. तिच्या अगतिकतेचा फायदा उचलण्याच्या इराद्याने या सफाई कामगाराने तिच्याकडे चक्क शरीरसुखाची मागणी केली. शरीरसुख दिल्यास रक्त आणि औषध मिळवून देण्याचे आमिष या सफाई कामगाराने दाखविले. यानंतर सदर महिलेने थेट पोलीस चौकी गाठून झालेला प्रकार पोलिसांच्या कानावर घातला. पोलिसांनी तातडीने हा प्रकार रुग्णालय प्रशासनाला कळविला. या प्रकरणी महिलेने लेखी तक्रार दिल्यास कारवाई करण्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी सायंकाळपर्यंत लेखी तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात मोठी खळबळ उडाली.रुग्णालय प्रशासनाने दिली केवळ समजपीडित महिलेने तिच्या सोबत झालेला प्रकार पोलिसांना सांगितल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने त्याची दखल घेतली. महिलेने लेखी तक्रार दिली नसल्यामुळे प्रशासनाने या सफाई कामगाराविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. केवळ समज देऊन त्याला सोडून दिले. महिलेने लेखी तक्रार दाखल केल्यास या सफाई कामगाराविरुद्ध कारवाई करता येईल, असे वैद्यकीय महाविद्यालयातील एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.दलालांचा सुळसुळाटसर्वोपचार रुग्णालयाचा आवाका मोठा असल्याने या ठिकाणी रुग्णांची कायम परवड असते. रुग्णांच्या अगतिकतेचा फायदा घेण्यासाठी दलाल टपलेले असतात. रक्त, औषधे व इतर सुविधा मिळवून देण्याच्या मोबदल्यात दलाल रुग्णांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करतात. हा सर्व प्रकार रुग्णालय प्रशासनाला माहीत असल्यानंतरही त्यांच्याविरुद्ध कुठलीही ठोस कारवाई केली जात नसल्याचे वास्तव आहे.