- विजय शिंदे
अकोट: करोनो विषाणूपासून बचाव करण्याच्या दृष्टीकोनातून विविध प्रकारच्या सॅनिटायझरचा वापर वाढला आहे. स्वच्छ हात धुण्यासाठी सॅनिटायझरची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. सॅनिटायझरची मागणी वाढल्यामुळे अकोट शहरात सर्रास काळाबाजार होत असल्याचे उघड झाले आहे. कोरोना विषाणूमुळे भितीचे सावट असून, या भितीचा काही औषध विक्रेत फायदा घेत असल्याचे अकोट शहरात दिसून येत आहे. काही औषध विक्रेते जनतेची लुट करीत असल्याने, प्रशासनाने त्वरीत काळाबाजाराला आळा घालण्याकरीता कठोर पाऊले उचलण्याची गरज आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जनजागृती करण्यात येत आहे. सर्वांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनापासून बचाव होण्यासाठी स्वच्छ हात धुण्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी वैद्यकीय सल्ल्यानुसार सॅनिटायझरचा वापर वाढला आहे. सॅनिटायझरची वाढती मागणी लक्षात घेता, काही विक्रेत्यांनी काळाबाजार सुरू केला आहे. सॅनिटायझरच्या बाटलीवरील लेबल समोरील किंमतीत हेराफेरी करून अधिक किंमतीने विक्री सुरु केली आहे. काही कंपनीच्या सॅनिटायझरची किमंत ९५ रुपये असताना, विक्रेते स्वत:च हाताने १९५ किंमत टाकून विक्री करीत असल्याचा अनुभव लोकांना येत आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे काही दुकानदार आधी सॅनिटायझर उपलब्ध नसल्याचे सांगतात. उपलब्ध असले तर बिल देत नाहीत. त्यात भर म्हणून की काय, आता चक्क किंमतीच्या आकड्यांची खोडतोड करून ग्राहकांची लूट करण्यात येत आहे. यासंदर्भात आरोग्य विभागासह अन्न व औषधी प्रशासनाने औषधांच्या दुकानांची तपासणी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.