- अतुल जयस्वाल
अकोला : पंतपप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून, यामध्ये अकोला लोकसभा मतदार संघातून सलग चौथा विजय मिळविलेले भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय धोत्रे यांना मनुष्यबळ विकास मंत्रालयातील राज्यमंत्री पद देण्यात आले आहे. याशिवाय दळणवळण मंत्रालय व ईलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील राज्यमंत्री पदाचीही जबाबदार त्यांना देण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी गुरुवारी पार पडल्यानंतर शुक्रवारी मंत्रीमंडळाची पहिली बैठक होणार आहे. त्या पृष्ठभूमीवर आज खातेवाटप जाहीर करण्यात आले. यामध्ये संजय धोत्रे यांना तीन मंत्रालयातील राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.अकोला लोकसभा मतदारसंघात सलग चौथा विजय मिळवून खासदार अॅड. संजय धोत्रे यांनी मतदारसंघाच्या इतिहासात नवीन विक्रम प्रस्थापित करून त्यामध्ये आणखी एका विक्रमाची भर घातली आहे. खा. धोत्रे यांच्यातील नेतृत्व गुण हेरत भारतीय जनता पार्टीच्यावतीने त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदासाठी निवड करण्यात आली आहे. खा. धोत्रे यांच्या रूपात अकोला जिल्ह्याला प्रथमच केंद्रीय राज्यमंत्री पदाचा मान मिळाला आहे. त्यांच्या निवडीमुळे भाजप-शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे उधाण आले आहे. काल सायंकाळी दिल्ली येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात त्यांनी इतर मंत्र्यांसोबत शपथ घेतली होती.लोकसभेच्या १७ व्या निवडणुकीत अकोला मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्यावतीने खासदार अॅड. संजय धोत्रे यांना सलग चौथ्यांदा उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शड्डू ठोकल्यामुळे निवडणुकीत रंगत आली होती. काँग्रेसच्यावतीने हिदायत पटेल यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिल्यामुळे मतविभाजनाचा फायदा भाजपच्या अॅड. धोत्रे यांना होईल, असा कयास सुरुवातीपासूनच लावला जात होता. २०१४ मधील राजकीय पटलावरील घडामोडी व मोदी लाट पाहता यावेळी मतदानाची टक्केवारी वाढणार की नाही, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात होती. यंदाच्या निवडणुकीत १८ लाख ६१ हजार ७३९ मतदारांपैकी ११ लाख १६ हजार ७६३ मतदारांनी आपल्या अधिकाराचा वापर केला. यावेळी निवडणुकीत १ लाख ९१ हजार ८७८ नवीन मतदारांच्या संख्येत वाढ झाली. त्यापैकी तब्बल १ लाख ४४ हजार ४७८ मतदारांनी मतांचे दान केले होते. ही वाढीव टक्केवारी खासदार अॅड. संजय धोत्रे यांच्या पारड्यात पडल्याचे निकालाअंती समोर आले.