लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : उन्हाळय़ाहूनही बिकट परिस्थिती निर्माण झालेली असल्याने अकोला एमआयडीसीतील शेकडो उद्योग बंद पडतात की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. खांबोरा पाठोपाठ आता कुंभारीचा पाणीपुरवठाही काही दिवसांतच संपुष्टात येणार आहे. त्यानंतर उद्योगांना पाणी तरी कोठून द्यायचे, याचा शोध आता एमआयडीसीचे अधिकारी घेत आहेत. कुंभारी तलावातील विहिरी यापुढे संजीवनी देऊ शकतात, त्या दिशेने आता एमआयडीसीच्या अधिकार्यांनी चाचपणी सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीमधील ८९0 उद्योगांना पाणीपुरवठा करणार्या खांबोरा प्रकल्पाने पाणी देणे बंद केले. त्यामुळे सप्टेंबरपासून एमआयडीसीने कुंभारीच्या तलावातून पाणीपुरवठा सुरू केला; मात्र कुंभारी तलावातील पाणीदेखील पुरेसे नाही. पावसाची कृपा झाली नाही, तर ऑक्टोबरमध्ये उद्योगांना पाणी पुरविणे अशक्य होईल. त्यामुळे अकोल्यातील उद्योजक आणि एमआयडीसी अधिकारी चिंतातुर झाले आहेत. एमआयडीसीच्या अधिकार्यांनी पर्याच म्हणून परिसरातील चार विहिरी अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांपुढे ठेवला आहे. औद्योगिक वसाहतीमधील ८९0 उद्योगांना कधीकाळी कुंभारी तलावातूनच पाणीपुरवठा व्हायचा. कुंभारीचा तलाव आजपर्यंंंत कोरडा पडल्याचे कुणाला आठवत नाही; मात्र यंदा पाऊस नसल्याने कुंभारी तलावाची पातळी वाढू शकली नाही. गोरव्हा, कातखेडा, येवता, एरंडा-परंडा परिसरात पाऊस झाला, तर लोणारमेघ नाल्यातून पाण्याचा लोंढा कुंभारी तलावात येतो. त्यामुळे या तलावातील पाणी शक्य तोवर आटत नाही.जवळपास शंभर एकरच्या विस्तीर्ण क्षेत्रफळात तलाव व्यापला आहे. कुंभारी ते येवतापर्यंंंत स् पर्शलेल्या या तलावात कधीकाळी लहान-मोठय़ा सहा विहिरी होत्या. त्या आता या तलावात दिसत नाहीत. तलाव कोरडा पडल्यास त्यातील सहाही विहिरींचा उपसा करून त्यातील गाळ काढल्यास पुन्हा झरे येथे येऊ शकतात, असे गावकर्यांचे मत आहे. जर भविष्यात पाणीटंचाई निर्माण झाली, तर या विहिरी कायम पाणी देत राहतील. कारण कुंभारी परिसरातील पाण्याची पातळी अजूनही खालावलेली नाही. आता जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय आणि एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राहुल बन्सोड या प्रकरणी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांंंचे लक्ष लागून आहे.
आजपर्यंंंत कुंभारीचा तलाव कोरडा पडलेला पाहिला नाही. कुंभारीत कधीच पाणीटंचाई झाली नाही. उन्हाळ्यातही येथे पाणी समस्या कधी आली नाही. त्यामुळे कुंभारी तलावातील विहिरी उपसून त्याचा उपयोग केला गेला पाहिजे.-सिंकदर शहा, रा. कुंभारी.