अकोला: टाळ-मृदंगाचा गजर...मुखी हरिनाम...रांगोळ्यांचा सडा...पुष्प वर्षाव...फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या निनादात अकोलेकरांनी संत गजानन महाराजांच्या पालखीचे सोमवारी सकाळी ६ वाजता डाबकी रेल्वेगेटवर हर्षोल्हासात स्वागत केले. टाळ-मृदंगाच्या तालावरील कीर्तन आणि संत गजाननाच्या जयघोषाने अकोलेकर भक्तिगंगेत न्हाऊन निघाले. हजारो भाविकांनी खंडेलवाल विद्यालयासह मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रागंणात श्रींचे दर्शन घेतले.श्रीक्षंत्र पंढरपूरला जाण्यासाठी श्रींची पालखी ४४ वर्षांपासून अकोल्यात येत आहे. श्रींची पालखी येणार म्हणून भाविकांनी डाबकी रोड, गोडबोल प्लॉट, विठ्ठल मंदिर मार्ग, टिळक रोडवर रांगोळ्यांचा सडा घातला. रस्त्याच्या दुर्तफा भाविकांनी पालखीतील श्रींच्या मुखाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. डाबकी रोडवर भक्तिमय वातावरण झाले होते. चौकांमध्ये भाविकांनी वारकऱ्यांना बिस्कीट, फलाहार, अल्पोपाहार, चहा, शरबताचे वितरण केले. पालखी भिकमचंद खंडेलवाल विद्यालयात आल्यावर भाविकांनी दर्शनासाठी रीघ लावली होती. मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयात वारकऱ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी गोपाल महाराज राऊत, खेडकर महाराज, शांतीलाल खंडेलवाल, मदनलाल खंडेलवाल, गोपाल खंडेलवाल, रेखा खंडेलवाल, वासुदेव पाटील महल्ले यांच्यासह संत गजानन महाराज शेगाव पालखी सत्कार समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक दे.पु. अग्रवाल गुरुजी, अध्यक्ष शिवलाल बोर्डे, उपाध्यक्ष प्रकाश खंडेलवाल, कोषाध्यक्ष नारायण भाला, सचिव किशोर फुलकर, सहसचिव रा.वि. घाटे, दिनेश पांडव, शोभायात्रा प्रमुख नारायण आवारे, बाबासाहेब गावंडे, के.आर. पाटील, अरविंद पाटील, र.ना सप्रे, विजय रांदड, श्यामसुंदर मालाणी, बाप्पू देशमुख, गजानन ढगे, बंडू लाळेकर, भास्कर लांडे, गोविंद खंडेलवाल, दिलीप अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)