अकोला : औद्योगिक वसाहतमधील फेज क्रमांक २ मध्ये रुंगटा टायर्ससमोरील गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना साथ देणार्या अन्य आरोपींच्या शोधात एमआयडीसी पोलिसांचे एक पथक मध्य प्रदेशात गेले आहे. हे पथक हत्येसाठी वापरण्यात आलेला देशीकट्टा व दुचाकी जप्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. शिवणी परिसरातील रामनगर येथील रहिवासी संतोष घनश्याम शर्मा (३0) हे औद्योगिक वसाहतीतील श्रीहरी दालमिलमधून काम आटोपल्यानंतर दुचाकीने घराकडे जात असताना रुंगटा टायर्ससमोरच्या पहिल्याच वळणावर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात मारेकर्यांनी त्यांच्या कानाजवळ व मस्तकावर देशी कट्टय़ाने गोळी झाडून हत्या केली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात मारेकर्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला असता मध्य प्रदेशातील शिवणी येथील रहिवासी बबलू ऊर्फ रामेश्वर सनोदिया (२२) व गोलू ऊर्फ ईश्वर सनोदिया या दोन आरोपींना अटक केली. हे दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या दोघांसोबतच असलेल्या अन्य आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक मध्य प्रदेशात रवाना झाले आहे. हे पथक दुचाकी व देशीकट्टा हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
संतोष शर्मा गोळीबारप्रकरणी पथक मध्य प्रदेशात
By admin | Published: June 30, 2016 1:51 AM