अकोला : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुंगटा टायर्ससमोरून दुचाकीवर जात असलेल्या संतोष शर्मा यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करणाऱ्या मध्य प्रदेशातील रामेश्वर ऊर्फ बबलू सनोडिया या आरोपीस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. जी. खोब्रागडे यांच्या न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच आर्म्स अॅक्टमध्येही आरोपीस शिक्षा सुनावली आहे. या हत्याकांडातील एक आरोपी अद्यापही फरार असून, दुसºया आरोपीची सबळ पुराच्या अभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे.रामनगर येथील रहिवासी संतोष घनश्याम शर्मा हे त्यांच्या दुचाकीने २१ जून २०१६ रोजी एमआयडीसीतून घरी परत येत असताना त्यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळीबार केला होता. तीन वेळा गोळी झाडल्यानंतर एक गोळी संतोष शर्मा यांच्या शरीरात घुसल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी संतोष शर्मा यांचे बंधू यशवंत शर्मा यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात मारेकºयांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, १२० ब, ३४, ११८ आर्म्स अॅक्टच्या कलम ४,२५, २७ नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. ही हत्या तसेच गोळीबाराची सुपारी देऊन झाल्याचा संशय आल्याने पोलिसांनी तपास करताना मध्य प्रदेशातील शिवणी जिल्ह्यातील रहिवासी रामेश्वर ऊर्फ बबलू कवरसिंह सनोडिया त्याचा नातेवाईक ईश्वर ऊर्फ गोलू जीवनलाल सनोडिया या दोघांना अटक केली. तर तिसरा आरोपी राजकुमार कवरसिंह यादव अद्यापही फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, या खून खटल्यात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयाने १५ साक्षीदार तपासल्यानंतर सोमवारी निकाल दिला. या प्रकरणातील आरोपी रामेश्वर ऊर्फ बबलू सनोडिया यास ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कलम ११८ अन्वये सात वर्षांचा कारावास, २ हजार रुपये दंड तसेच आर्म्स अॅक्ट अन्वये ३ वर्षांचा कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली. तर बबलू हा आरोपी गोलू याच्या घरी घटनेपूर्वी थांबल्याचा कोणताही पुरावा गोलूविरुद्ध नसल्याने गोलूची निर्दोष सुटका करण्यात आली.बॅलेस्टिक अहवाल ठरला मैलाचा दगडतपासामध्ये घटनास्थळावरून देशी कट्ट्याच्या काडतूसची कॅप जप्त केली होती. त्यानंतर त्यांनी अटक केलेला आरोपी बबलू याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात देशी कट्टा व तीन काडतूस जप्त केले. घटनास्थळावरील कॅप व घरातील काडतूसच्या कॅपमध्ये साधर्म्य असून, जप्त केलेल्या देशी कट्ट्यातूनच गोळी झाल्याचे प्रमाणपत्र मिळवले. हा पुरावा सरकार पक्षासाठी महत्त्वाचा ठरला.