- नितीन गव्हाळे
अकोला: सारकिन्ही हे बार्शीटाकळी तालुक्यातील छोटसं गाव. काटेपूर्णाच्या पायथ्याशी वसलेल्या गावात बहुसंख्य कष्टकरी शेतकरी, शेतमजूर. मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळही नाही. आपल्या मुलांना बाहेरगावच्या कॉन्व्हेंट, खासगी शाळेत घालून मोकळे झाले की आपली जबाबदारी संपली ही भावना. अशा परिस्थितीत ब्रह्मसिंग राठोड नावाच्या ध्येयवेड्या शिक्षकाचा गावात प्रवेश झाला आणि शाळाच नाही तर अख्खं गाव बदलून गेलं. या शिक्षकाने १३९ घरांनाच शाळा बनवून टाकलं.सारकिन्हीची शाळा प्रयोगशील शिक्षणाचं माहेरघर ठरलं आहे. घराघरात चालणाऱ्या १३९ शाळा, रचनावादी झालेले पालक. सायंकाळी टीव्ही बंद करून स्वत:च अभ्यासाला बसणारे विद्यार्थी आणि सतत झटणारे शिक्षक हेच या शाळेचं भांडवल आहे. बह्मासिंग राठोड व त्यांच्या टीमने पालकांसोबत संवाद साधून शैक्षणिक साहित्य तयार करून मुलांचा शैक्षणिक दर्जा उंचावला. गावातून सहा आॅटोरिक्षांमध्ये बसून विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी कॉन्व्हेंटमध्ये जायचे. जिल्हा परिषदेची शाळा म्हटली की, शिक्षणाचा दर्जा सुमारच असणार, हा विचार या शिक्षकांनी खोडून काढला. आता सहापैकी पाच आॅटोरिक्षा बंद झाले. कॉन्व्हेंटमध्ये जाणारी मुले जिल्हा परिषद शाळेकडे वळू लागली. शिक्षणाच्या दर्जाने पालक प्रभावित झाले. एवढेच नाही तर यावर्षीच कॉन्व्हेंटमधील परगावातील २१ विद्यार्थी सारकिन्हीतील शाळेत दाखल झाली. शिक्षण शाळेपुरते मर्यादित न ठेवता, शिक्षणाला घराघरात पोहोचण्याचे कार्य ब्रह्मासिंग राठोड व सहकाºयांनी केले. प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी साहित्याचा संच देण्यात आला. त्यामुळे १३९ घराघरात शाळा सुरू झाली. त्या साहित्याद्वारे मुले स्वत:च शिकतात आणि पालकही त्यांना शिकवितात. अशाप्रकारे शाळा आणि समाज यांच्या संवाद सेतू तयार झाला आणि सारकिन्ही गाव घराघरांत शाळा असलेले महाराष्ट्रातील अभिनव ज्ञानरचनावादी गाव बनले.
पालक शाळेला धान्य भेट देतात...गावातील गरीब पालक शाळेला भरीव सहकार्य करतात. पैसे नसल्यास, धान्य शाळेला भेट देऊन शाळेच्या विकासात हातभार लावतातच. हे त्यांचे शाळेप्रती औदार्य नाही तर प्रेम आहे.चिमुकल्या मुलीने खाऊचे पैसे दिलेघरी पाहुणे म्हणून आलेल्या एका ८0 वर्षाच्या गृहस्थाने चिमुकल्या मुलीला खाऊ म्हणून पैसे दिले; परंतु या मुलीने मिळालेले खाऊचे पैसे शाळेला भेट देऊन टाकले. या पैशातून खाऊ खाऊन ती बलशाली होणार नाही; परंतु आपल्या गावातील विद्यार्थ्यांची पिढी बलशाली होईल, असा संदेशच तिने कृतीतून दिला.