बुलडाणा: तालुक्यातील नांद्राकोळीचे सरपंच यांच्यावरील अविश्वास प्रस्तावसाठी ९ मार्च रोजी दुपारी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सहभागी होण्यासाठी क्रुझर जीपने ८ ग्रामपंचायत सदस्य पोहोचले असता, सरपंच सर्मथकांनी जीपवर हल्ला करुन आत बसलेल्या ग्रा.पं.सदस्यांना मारहाण केली. जिपच्या काचा फोडल्या, तसेच तेथे तैनात पोलीस कर्मचार्यावर हल्ला केला. यात पोलीस कर्मचारी सुधाकर काळे जखमी झाले आहेत.तालुक्यातील नांद्राकोळी ग्रामपंचायतमध्ये ११ सदस्य असून, सदस्यांनी डॉ.हरिदास रामकृष्ण काळवाघे यांना सरपंच म्हणून निवडले; मात्र सरपंच काळवाघे अन्य ग्रा.पं.सदस्यांना विश्वासात न घेता, मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करीत नांद्राकोळी येथील १0 ग्रा.पं.सदस्यांनी बुलडाणा तहसीलदार यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव सदर केला होता, यानुसार तहसीलदार बाजड यांनी अविश्वास प्रस्तावावर चर्चेसाठी ९ मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालयात दुपारी २ वाजता बैठकीचे आयोजन केले. निर्धारित वेळेच्या १0 मिनिटाआधी या सभेत सहभागी होण्यासाठी एमएच २८ वी ६१६७ क्रमांकाच्या क्रुझर जिपने ८ ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत भवनात पोहोचले. त्यावेळी तेथे उपस्थित सरपंच सर्मथकांनी जिपवर हल्ला करुन आत बसलेल्या ग्रा.पं.सदस्यांना मारहाण करणे सुरु केले. बचावासाठी पोलीस कर्मचारी धावले असता, त्यांनाही सर्मथकांनी मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अतिरिक्त पोलीस पथकासह गावात दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली.
सरपंच सर्मथकांचा पोलिसांवर हल्ला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2016 2:11 AM