झरी बाजार, दिवानझरी, चिचारी, चंदनपूर, उंबरशेवडी, मोहपानी, या आदिवासीबहुल गावे मिळून असलेल्या झरी बाजार गट ग्रामपंचायतीचे सरपंच आमद मेहबूब सुरत्ने यांनी पदाचा दुरुपयोग करून गावातील मूळ मालमत्ता क्र. ७४ चे नोंदणी दस्तऐवज न लावता शासकीय मालमत्ता ग्राम सचिवांचा सल्ला न घेता नमुना ८-अ हा प्रफुल्ल रमेश भोपळे यांचे नावे केला.
तसेच सरपंचाने बेकायदेशीरपणे दिवानझरी येथील मालक लतीफ खा अमानत खा यांच्या नावे असलेली जागा अनोंदणीकृत दस्तऐवजद्वारे अब्दुल नजीर अब्दुल तालीब व अब्दुल नाझिम अब्दुल नजीर यांच्या नावाच्या नोटरी दस्ताऐवजाद्वारे त्यांच्या नावावर नमुना आठ-अ मध्ये नोंद केली.
याप्रकरणी अर्जदार भिका तायडे यांनी गैरअर्जदार सरपंच आमद महेबूब सुरत्ने, सचिव गट ग्रामपंचायत झरीबाजार, गटविकास अधिकारी तेल्हारा, मुख्य कार्यकारी अधिकारी अकोला यांच्या विरोधात अर्ज केला होता.
याप्रकरणी विभागीय आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांचा चौकशी अहवाल मागविला होता. या चौकशीत उपरोक्त कृत्यामुळे सरपंच आमद सुरत्ने यांनी अतिक्रमणास प्रोत्साहन दिले. शासन निर्णयाची पायमल्ली केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सरपंच या प्रकरणी दोषी आहेत असा चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांनी दिला होता.
यावरून विभागीय आयुक्त अमरावती पीयूष सिंह यांना सरपंच आमद सुरत्ने यांनी कर्तव्यात कसूर आणि अनियमितता केल्याचे स्पष्ट दिसून आल्याने त्यांनी वरील प्रकरणाची चौकशी करून पदाचा दुरुपयोग करणारे सरपंच आमद सुरत्ने यांना सरपंच पदावरून अपात्र घोषित केले आहे.