अकोला : संपूर्ण विदर्भात अकोला हे कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. सर्वाधिक मृत्यू व सर्वाधिक रुग्ण अकोल्यात आहेत. कोरोनाच्या या संकटाच्या विरोधात येथील प्रशासन व आरोग्य यंत्रणा तसेच लोकप्रतिनिधी आपल्या परिने प्रयत्न करत आहेत, अशा शब्दात प्रशासनाच्या प्रयत्नांवर समाधान व्यक्त करतानाच राज्य सरकारने येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला पदमान्यता दिली असती तर कोरोनाच्या लढाईत मोलाची भर पडली असती, असा टोलाही राज्याचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणविस यांनी सरकारला हाणला.देवेंद्र फडणविस हे सोमवारी अकोला दौºयावर होते. या दौºयात त्यांनी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात उभारलेल्या कोविड सेंटर तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात भेट देऊन कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला, त्यानंतर त्यांंनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, अकोल्याची परिस्थिती चिंताजनक आहे. येथील रग्णवाढीचा वेग हा १५ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे येणाºया काळात टेस्ट वाढविणे गरजेचे असून, मृत्यूदर आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे ते म्हणाले. कोविड सेंटर, तसेच विलगीकरण कक्षाला भेट दिल्यानंतर तेथील रुग्णांनी व्यवस्थेबाबत तसेच सर्वोपचारमधील रुग्णांनीही उपचाराबाबत समाधान व्यक्त केले, ही चांगली बाब आहे. प्रशासन आपल्या परिने प्रयत्न करत असल्याचे हे द्योतक आहे; मात्र दुसरीकडे राज्यशासन या यंत्रणांना सक्षम मदत करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. कोरोना संकटात महानगरपालिकासारख्या संस्था अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असताना या संस्थांना सरकारने अनुदान दिलेले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. भाजप सरकारच्या काळात अकोल्यात सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारले; मात्र या सरकारने रुग्णालयासाठी पदमान्यताच न दिल्याने ही इमारत शोभेची ठरली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री व मुख्य सचिवांशी लवकरच चर्चा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्यासह भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
कर्जमाफी नाही अन् हमीनंतर कर्जही नाहीराज्य सरकारने केलेली कर्जमाफी ही फसवी निघाली. ज्या शेतकºयांचे कर्ज माफ झाले नाही त्यांना आता नवे कर्ज मिळत नाही. सरकारने बँकांना हमी दिली असली तरी या हमीवर कर्जवाटप होत नाही, त्यामुळे बँकांनी सरकारचा आदेशच जुमानला नसल्याने शेतकºयांची फरफट होत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.