कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन: तालुक्यात २७ हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणीचे नियोजन
संतोषकुमार गवई
पातूर: येत्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःच्या घरी असलेले सोयाबीनचे बियाणे उगवण क्षमता तपासूनच पेरणीसाठी वापरावे, असे आवाहन पातूर तालुका कृषी अधिकारी डी.एस. शेटे यांनी केले आहे. दरम्यान, खरीप हंगामासाठी तालुक्यात जवळपास ४२,५०० हेक्टरवर पेरणीचे नियोजन असून, यापैकी २७ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उगवण क्षमता तपासूनच पेरणीसाठी बियाणे वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत सोयाबीनचे भाव वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील दोन वर्षांपर्यंत वापरता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःकडे खरीप हंगामातील राखून ठेवलेल्या घरातीलच सोयाबीन बियाणांचा वापर कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना संसर्गाचा फटका सर्वच व्यवसायांना बसल्याने महागाईत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःकडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल व प्रमाणित बियाणांपासून उत्पादित झालेले सोयाबीन यावर्षी पेरणीसाठी वापरू शकतात. प्रमाणित बियाणाच्या उत्पादनातून प्रतवारी करून चांगल्या प्रकारच्या सोयाबीनचे बियाणे म्हणून निवड करावी. मात्र, हे करत असताना योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
------------------------------------------
सोयाबीन बियाणे साठवणुकीची योग्य पद्धत
स्वच्छ केलेले बियाणे चांगल्या नवीन व गोनपाट पोत्यात साठवावे; मात्र यासाठी प्लास्टिक पोत्यांचा वापर टाळावा. पोत्याची थप्पी ठेवताना थंड किंवा ओलावा विरहित, हवा असलेल्या जागेत ठेवावे. सोयाबीन बियाणे हवेतील आर्द्रता लवकर शोषून घेते. जिल्ह्यात मागील खरीप हंगामात सोयाबीन पिकाच्या काढणीवेळी पाऊस झाल्याने काही प्रमाणात सोयाबीन बियाणे भिजले आहेत. त्यामुळे सोयाबीन बियाणाच्या उगवण क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी घरच्याघरी बियाणाची आधी उगवणक्षमता तपासावी.
---------------------------------------------
तालुक्यात उडीद, मुगाचे क्षेत्र घटणार!
गतवर्षी तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उडीद, मुगाची पेरणी केली होती. पीक चांगले बहरले होते; मात्र ऐन फुलधारणेच्या अवस्थेत अज्ञात व्हायरसने आक्रमण केल्याने उत्पादनात प्रचंड घट आली. त्यामुळे शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघाला नाही. काही शेतकऱ्यांनी तर उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे यंदा तालुक्यात उडीद, मुगाचे क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी विभागामार्फत वर्तविण्यात आली आहे.