- संजय खांडेकरअकोला : पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये गेल्या आठ वर्षांत २० हजार जागरूक माता-पित्यांनी ‘स्टेम सेल’चे जतन केल्याची नोंद समोर आली आहे. आरोग्याबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण होत असल्याचे स्टेम सेल बँकांच्या आकडेवारीतून दिसून येत आहे.आईच्या गर्भनाळेतील स्टेम सेलचे महत्त्व आता सर्वसामान्य लोकांनाही कळले आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ येथील जागरूक आई-वडिलांनी गेल्या आठ वर्षांत २० नागरिकांनी गुडगाव आणि चेन्नईच्या बँकेत ‘स्टेम सेल ’ जतन केले आहे. सोबतच या वीस हजार नागरिकांनी कम्युनिटी स्टेम सेल बँकिंगमध्येही सहभाग नोंदविला असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. प्रायव्हेट आणि कम्युनिटी स्टेम बँक सध्या देशात अस्तित्वात असून, त्याचे केंद्र नाशिक, नागपूर, पुणे येथे कार्यरत आहे. खासगीपेक्षा कम्युनिटी स्टेम बँकेत नाळ ठेवणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कम्युनिटी स्टेम बँकेतून कितीही वेळा उपचारासाठी नाळ मिळण्याची सुविधा असल्याने आणि ९५ टक्के स्टेम मॅच होत असल्याने नागरिकांचा कल त्याकडे आहे. कॅन्सर, थॅलेसेमीया आणि आनुवंशिक मधुमेहदेखील दुरुस्त करण्याची किमया स्टेम सेलमुळे शक्य आहे. बोनमॅरोपेक्षा कमी खर्च स्टेम उपचार पद्धतीला लागत असल्याने पुढच्या पिढीसाठी ही पद्धती संजीवनी ठरत आहे.काय आहे स्टेम सेल..नवजात बाळासोबत जोडलेल्या आईच्या गर्भनाळेत हे स्टेम सेल असते. भविष्यातील ८० टक्के रोग या स्टेम सेलमुळे टाळता येऊ शकतात. हे संशोधनातून समोर आल्याने आता स्टेम सेलच्या बँका निघाल्या आहेत.७५ वर्षे बँकेत सुरक्षित राहते ‘स्टेम सेल’गर्भनाळेतून काढलेले स्टेम सेल किमान २१ आणि कमाल ७५ वर्षे बँकेत सुरक्षित राहते. अद्ययावत अशी लॅब वजा बँक चेन्नई आणि गुडगाव येथे अस्तित्वात आहे. वजा १९६ डिग्री सेल्सियस लिक्विड नायट्रोजनच्या सान्निध्यात ते ठेवावे लागते. गर्भनाळेतील आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लाझ्मासेल वेगळे काढून त्यातील केवळ स्टेम सेल स्टोअर केले जाते.