अकोला: महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी, या हेतूने जिल्हा स्तरावर विक्री प्रदर्शनासाठी शासनाने निधी दिला होता. तो खर्च झाला नाही, याबाबत विधान परिषद सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या उत्तरात ना. मुंडे यांनी निर्देश दिले आहेत.अकोला जिल्ह्यातील महिला बचत गटांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या हेतूने विभागीय आणि जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शन आयोजित करण्यासाठी अमरावती विभागास २५ लाख आणि उर्वरित जिल्ह्यांसाठी ५० लाख, असा ७५ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. यापैकी अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्याने विक्री प्रदर्शन आयोजित करून निधी खर्च केला आहे; मात्र अकोला जिल्हा परिषदेने डिसेंबर २०१८ मध्ये विक्री व प्रदर्शनासाठी निविदा मागविल्या होत्या. त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. त्याला मुदतवाढ देऊन पुन्हा निविदा मागविण्याच्या कार्यवाहीला विलंब झाल्याने हे काम रखडले. या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश जि.प. सीईओ यांना देण्यात आल्याचेही ना. मुंडे यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले.मोर्णा महोत्सवात ‘स्वस्ती’चा बळी देण्याचा होता घाटअकोला: महिला बचत गटांच्या स्वस्ती प्रदर्शनाचे दहा लाख रुपये मोर्णा महोत्सवाच्या कामी आणण्याचा घाट तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी घातला होता; मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्या प्रयत्नामुळे हा प्रयत्न फसला. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांना विश्वासात न घेताच मोर्णा महोत्सवासाठी स्वस्ती प्रदर्शनाचे १० लाख रुपये वापरण्यासाठी असे प्रदर्शन आयोजित केल्याचे पत्र ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्रीराम कुळकर्णी यांनी दिले. त्यामुळे आश्चर्यचकित झालेल्या अध्यक्ष वाघोडे यांनी तातडीने विभागीय आयुक्त पीयूषसिंह यांच्याकडे धाव घेत हा प्रकार थांबविला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला हाताशी धरून स्वस्ती प्रदर्शनाचा निधी मोर्णा महोत्सवाच्या पाण्यात घालण्याचा प्रयत्न जोरकसपणे केल्याचे पुढे आले होते.