अकोला : पंचायत समिती अंतर्गत असलेल्या रामगाव येथे स्वच्छ भारत अभियानातील शौचालय निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. एकाच घरात दोन शौचालयांचा लाभ देत बांधकाम करणाऱ्यांनी लाभार्थींच्या खात्यातून परस्पर रक्कम काढली. त्याचवेळी अनेकांच्या शौचालयाचे बांधकाम जमीनदोस्त झाले. गावात घडलेला हा मोठा घोटाळा असून, त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी विश्वास डोमाजी इंगळे यांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना निवेदनातून केली आहे.गावात हगणदरीमुक्त अभियान राबविताना शौचालय बांधकामासाठी लाभार्थी निवड करताना यादीचे वाचन ग्रामसभेत करण्यात आले नाही. ग्रामसभेची मान्यता न घेता तसेच काम केल्याची खातरजमा न करताच ग्रामपंचायतने रक्कम खर्चाला मंजुरी दिली. लाभार्थी निवड करताना घरकुल, शौचालयाच्या पात्र लाभार्थींची निवड न करता पदाधिकाºयांनी पदाचा दुरुपयोग केला. त्यातून नातेवाइकांची निवड केली. सोबतच मयत व्यक्ती, गावातून कायम स्थलांतरित कुटुंब, पती व पत्नीची स्वतंत्र कुटुंबे दाखवून लाभ देणे, एकत्र कुटुंबात राहणाºयांना वेगळे दाखवून लाभ देणे, आई व मुलगा सोबत राहत असताना दोन शौचालय मंजुरी, केवळ तीन भिंती उभारल्या, त्यावर छत नाही, सीट नाही, तरीही रक्कम देण्यात आली. एकाच व्यक्तीला दोन वेळा शौचालयाचा लाभ देणे, स्वच्छ भारत योजनेतून टिनपत्रे प्रकारात बांधलेल्या शौचालयाच्या कामात अनेक त्रुटी आहेत. केवळ खड्डे खोदले, सीट जमीन स्तरावर बसविली. पावसाचे पाणी त्यात जात असल्याने उपयोग होऊ शकत नाही, त्यांनाही लाभ देण्यात आला. हा मोठा घोटाळा असून, तातडीने चौकशी करावी, चौकशीच्या अर्जदार, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्षांना उपस्थित ठेवावे, या मागण्या निवेदनात केल्या आहेत.