- प्रवीण खेतेअकोला: राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असून, यामध्ये प्रामुख्याने विदर्भ, मराठवाड्यातील स्थिती बिकट असल्याची माहिती आहे. गत वर्षभरात हाफकीनमार्फत औषधांसाठी ४८० कोटींची आॅर्डर देण्यात आली होती. त्यापैकी केवळ ४० ते ४५ टक्के औषधेच विविध वैद्यकीय महाविद्यालयांना मिळाले असून, ५५ टक्के औषधे अजूनही बहुतांश ठिकाणी पुरविण्यात आले नाहीत. त्यामुळे गरिबांसाठी आजाराचा उपचार महागडा झाला आहे.वैद्यकीय उपकरणांसह औषधे खरेदीमध्ये आर्थिक बचत व्हावी, या उद्देशाने वर्षभरापूर्वी शासनाने हापकीनमार्फत औषधे आणि वैद्यकीय उपकरणे खरेदीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली होती. तत्पूर्वी औषधे खरेदी बंद असल्याने राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व सर्वोपचार रुग्णालयांमध्ये औषधांची चणचण भासू लागली होती. मान्यता मिळाल्यानंतर गत सहा महिन्यांपूर्वी राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयांकडून औषधांच्या मागणीला सुरुवात झाली; परंतु अद्यापही ५५ टक्के औषधे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयांपर्यंत पोहोचले नाहीत. त्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात रुग्णांवर उपचारासाठी औषधेच नाहीत.२०० कोटींच्या वैद्यकीय उपकरणांची मागणीऔषधांसोबतच हापकीनकडे २०० कोटींच्या वैद्यकीय उपकरणांची मागणी राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय माहविद्यालयांमधून करण्यात आली होती. त्यापैकी केवळ १५ ते २० टक्के वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने सीटीस्कॅन, व्हेंटिलेटर यासारख्या मोठ्या वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. १५० कोटींच्या वैद्यकीय उपकरणांवर आवश्यक चाचण्या घेण्याचे काम सुरू असून, एप्रिल २०१९ पर्यंत ही उपकरणेदेखील राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व शासकीय रुग्णालयांना पुरविण्यात येणार असल्याची माहिती हाफकीनमार्फत सांगण्यात आली.या औषधांचा तुटवडापॅरासिटामॉल, टॅब सिप्रो, अॅमॉक्सीलीन, सिट्रीझीन, अॅम्लोडीपीन, (शुगर) मेटफॉरमीन, इन्शुलीन, डायक्लोफीनॅक, क्लोट्रीमॅझोल,ओआरएस पावडर.
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व शासकीय रुग्णालयाच्या मागणीनुसार औषधांसाठी ४८० कोटींची आॅर्डर दिली आहे. त्यापैकी ४० ते ४५ टक्के औषधे पुरवठा झाला आहे. उर्वरित औषधसाठा जानेवारीपर्यंत पुरविण्यात येईल. शिवाय, एप्रिलपर्यंत वैद्यकीय उपकरणेही पुरविण्यात येतील.- परमेश्वर कोगमोरे, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, हाफकीन, मुंबई.