- प्रवीण खेते
अकोला : जगभरात थैमान माजविणारा कोरोना सर्वांसाठीच अपरिचित असल्याने सुरुवातीला भीती वाटली. कोविडच्या गंभीर रुग्णांना पाहून मनही अस्थिर झाले; पण रुग्णसेवेचा ध्यास कायम ठेवत आम्ही रुग्णसेवा सोडली नाही, तर अनेकांना धीर देऊन ते कोरोनामुक्त होईपर्यंत त्यांची सेवा केल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिपरिचारिका रोशनी कडू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जिल्ह्यात पहिल्यांदाच कोरोनाचा शिरकाव झाला, तेव्हा सर्वांच्याच मनात भीती होती. अशा परिस्थितीत थेट आयसीयूमध्ये ड्युटी लागल्याने थेट गंभीर रुग्णांशी सामना झाला. बहुतांश रुग्ण हे ५० वर्षांपेक्षा जास्त वयाची होती. त्यांना श्वास घेण्यास होणारा त्रास बघवल्या जात नव्हता. मन हेलावून टाकणारे दृश्य पाहून सुरुवातीला मानसिक त्रास झाला. शिवाय, पीपीई किटमुळे डोकेदुखीसह इतरही समस्यांना सामोरे जावे लागले. रुग्णसेवा करताना अशी भीती यापूर्वी कधीच वाटली नव्हती. शिवाय, कुटुंबापासून दूर असल्याने मनात अनेक वाईट विचारांनी घर केलं होतं. पण आम्ही रुग्णसेवेचा ध्यास सोडला नाही. परिचारिका, डॉक्टर यांच्यासह आरोग्य विभागातील प्रत्येक कर्मचारी एकमेकांचा आधार झाल्याने मानसिक पाठबळ मिळाले. त्यामुळे हळूहळू कोरोनाविषयीची भीती दूर होऊ लागली. रुग्णांनाही धीर देऊन त्यांची शुश्रूषा करू शकलो. मन हेलावून टाकणाऱ्या दृष्यासोबतच अनेक रुग्ण आयसीयूतून बरे होऊन गेल्याने मन समाधानी होऊ लागलं. आता कोरोनाविषयी फारशी भीती नाही, पण खबरदारी नक्कीच घेत असल्याचे कडू यांनी सांगितले.
दहा वर्षात पहिल्यांदाच मुलाचा वाढदिवस नाही
रुग्णसेवेसोबत कुटुंबही तेवढेच महत्त्वाचे आहे. पण यंदा कोरोनामुळे सुरुवातीला कुटुंबापासून दूर राहावे लागले. त्यामुळे यावर्षी मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशही त्याच्या जवळ नसल्याचं दु:ख होतं. गत दहा वर्षात असं पहिल्यांदाच झाल्याचं रोशनी कडू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.