अकोला: जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी, बारावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान व संयुक्त शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने प्रथम सत्र परीक्षेचे वेळापत्रक तयार केले असून, या वेळापत्रकानुसार महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिला आहे.जिल्ह्यातील मुख्याध्यापक, प्राचार्यांना कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रथम सत्र परीक्षेसंबधी सूचना देण्यात आल्या आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान संयुक्त शाखेची प्रथम सत्र परीक्षेसाठी असलेल्या अभ्यासक्रमानुसार संबंधित कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांनी प्रश्नपत्रिका तयार करून विद्यार्थ्यांचे पेपर घ्यावेत आणि वेळापत्रकानुसारच परीक्षा घेण्यात यावी, परीक्षा घेण्यात येत आहेत की नाहीत, यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाचे पथक तपासणी करणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयांना दिलेल्या अभ्यासक्रमानुसार प्रथम सत्र परीक्षा घ्यावी, २२ आॅक्टोबरपासून परीक्षेला सुरुवात होईल. २२ आॅक्टोबर रोजी अकरावी व बारावीचा सकाळी ७.३0 ते ९.३0 आणि सकाळी ९.३0 ते ११.३0 वाजतापर्यंत इंग्रजी, २३ आॅक्टोबर रोजी मराठी/हिंदी, इलेक्ट्रॉनिक, कॉम्प्युटर सायन्स, एफडब्लूएफसीआय, २४ आॅक्टोबर रोजी भौतिकशास्त्र, २५ आॅक्टोबर रोजी गणित व अर्थशास्त्र, २६ रोजी रसायनशास्त्र, २७ रोजी जीवशास्त्र, २९ रोजी आयटी, इलेक्ट्रानिक २, कॉम्प्युटर सायन्स २, एफडब्लूएफसीआय २ आणि ३0 आॅक्टोबर रोजी आरोग्य व शारीरिक शिक्षण विषयांचे पेपर होतील. यासोबतच वरील तारीख व वेळेनुसार अकरावी, बारावीच्या कला व वाणिज्य शाखा विद्यार्थ्यांचे इंग्रजी, मराठी हिंदी, चिटणिसाची कार्यपद्धती, राज्यशास्त्र, वाणिज्य संघटन, व्यवस्थापन, इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, सहकार, पुस्तक पालन व लेखा कर्म व उर्वरित पेपर घेण्यात येणार आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, सहायक शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड यांनी दिली. (प्रतिनिधी)