- नितीन गव्हाळे
अकोला : एनएमएमएससह इतर शिष्यवृत्तीच्यापरीक्षा होऊ शकतात. शालेय विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर बोलावून त्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्यात येते. मग शाळेची परीक्षा का घेण्यात येत नाही, असा सवाल पालकांसह काही शिक्षणतज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. पहिली ते आठवी व नववी, अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता, पास करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे; परंतु या निर्णयाला काही पालकांनी विरोध केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात दररोज हजारो कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना संसर्गामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता, राज्य शासनाने इयत्ता पहिली ते आठवी आणि इयत्ता नववी ते अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करून त्यांना पुढील वर्गात तसेच ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरूद्ध पालक व शिक्षणतज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली असून, शालेय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थी, शिक्षकांना परीक्षा केंद्रावर बोलाविण्यात येते. तेव्हा त्यांना कोरोनाचा संसर्ग होत नाही. शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्यामुळे कोरोनाचा संसर्ग कसा पसरतो, हे अनाकलनीय असल्याचे पालकांनी म्हटले आहे. परीक्षा न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास बाजूला सारला आहे. परीक्षाच नाहीतर अभ्यास नाही. या विचारातून मुले अभ्यासाकडे दुर्लक्ष करू शकतात आणि त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती पालकांसह शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याविषयी विचार करावा, असेही पालकांचे म्हणणे आहे.
परीक्षेबाबत तज्ज्ञ काय म्हणतात...
शिष्यवृत्तीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असते; परंतु शालेय विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली, तर विद्यार्थीसंख्याच लाखाच्या घरात आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत शालेय विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे घातक ठरेल. विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे.
-डॉ. वर्षा संजय पाठक, माजी मुख्याध्यापिका
सध्या कोरोनाची भीषण परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत शालेय विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे, म्हणजे विद्यार्थ्यांना मृत्यूच्या दारात ढकलण्यासारखे आहे. त्यामुळे सध्या परीक्षा नकोच. शिष्यवृत्तीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असते.
-प्रा. डॉ. रवींद्र भास्कर, शिक्षणतज्ज्ञ
एकीकडे शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते; परंतु शाळांच्या परीक्षा रद्द केल्या जातात. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. शिक्षकांनी वर्षभर विद्यार्थ्यांना अध्यापन केले. विद्यार्थ्यांनी अभ्यास केला; परंतु परीक्षा होत नसल्याने, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे शासनाने परीक्षा घ्याव्यात.
-शत्रुघ्न बिरकड, अध्यक्ष, मुख्याध्यापक संघटना विदर्भ
शाळा बंद आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे मुलांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. आतातर परीक्षाच रद्द केल्या आहेत. त्यामुळे अभ्यास, दप्तर बाजूलाच ठेवले गेले. परीक्षा घेण्यात आल्या तर त्यानिमित्ताने विद्यार्थी अभ्यास करतील. परीक्षा नसल्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता खालावणार आहे.
-विभा गोपाल गावंडे, पालक
शिष्यवृत्तीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असते; परंतु शालेय परीक्षा घेतली, तर हजारो विद्यार्थी बाहेर पडतील. एक परीक्षा एक दिवस नव्हे, तर आठवडाभर किंवा १५ दिवस चालणार. परीक्षा देण्यासाठी शाळेत जावे लागणार. सध्या परीक्षा रद्द केल्या, हेच योग्य आहे.
-शिवदास बोंबटकार, पालक
ही ढकलगाडी काय कामाची
परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पास करणे योग्य नाही; परंतु कोरोनाची परिस्थिती पाहता, शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचारही होणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया काही पालकांनी व्यक्त केली, तर काही पालकांनी ही ढकलगाडी काय कामाची... असा प्रश्न उपस्थित करीत, शासनाने परीक्षा न घेण्याचा घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम करणारा असल्याचे म्हटले आहे.
एकूण विद्यार्थी- २,३५,२१३
पहिली ते आठवी विद्यार्थीसंख्या
अकोला- ९१,६७४
अकोट- ३४,४५५
बाळापूर- २५,५२४
बार्शिटाकळी- १७,०११
मूर्तिजापूर- २०,०६३
पातूर- १७,१६५
तेल्हारा- २१,८४२
मनपा- ७,४७९