अकोला: जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १५ वर्षीय शालेय विद्यार्थ्यावर अज्ञात व्यक्तीने चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. उज्जेन हसन खान हा गंभीर जखमी मुलगा इचे नगर परिसरातील जंगलात पडलेला होता. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या मुलावर हल्ला करण्याचे कारण मात्र समोर आले नाही.पातूर येथील रहिवासी अफसर खान छोटे खान यांचा मुलगा उज्जेन हसन खान हा गीता नगर परिसरातील सेंट अॅन्स शाळेचा विद्यार्थी आहे. त्यामुळे तो अकोल्यात रहिवासी असून, त्याच्यावर शनिवारी दुपारी अज्ञात मारेकऱ्याने चाकूने हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी झालेला मुलगा गंगा नगर परिसरातील इचे नगरजवळ असलेल्या जंगलात पडून होता. काही लोक या परिसरात गेले असता त्यांना हा मुलगा रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी तातडीने जुने शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून मुलाला उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविले; मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, तो बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी सदर परिसरातील सीसी कॅमेºयाची तपासणी सुरू केली असून, त्याच्यावर हल्ला करणारा कोण आहे, याचा शोध सुरू केला आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत मुलावर झालेल्या हल्ल्याचे कारण समोर आले नाही; मात्र पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला असून, तीन पथके यासाठी कार्यरत करण्यात आली आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयात धावसदर मुलाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सायंकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. या मुलावर चाकूहल्ला करणाºयाचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली. यासह नागरिकांनीही जुने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात मारेकºयाचा तातडीने शोध घेण्याची मागणी जुने शहर पोलिसांकडे केली आहे.