लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: समग्र शिक्षण, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्यावतीने शाळासिद्धी उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे स्वयंमूल्यांकन आणि बाह्यमूल्यांकनाचा अहवाल देण्यात जिल्ह्यातील शाळा माघारलेल्याच असून, येत्या चार दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. स्वयंमूल्यांकन व बाह्यमूल्यांकनात शाळांमध्ये पायाभूत सुविधा, शैक्षणिक सुविधांनुसार शाळांना ग्रेड दिला जाणार आहे.शाळासिद्धी उपक्रमाची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील सर्व शाळांचे शाळासिद्धी कार्यक्रमांतर्गत स्वयंमूल्यांकन करणे व त्यापैकी किमान २० हजार शाळांना समृद्ध शाळा करण्याची उद्दिष्टे निश्चित केली होती. या मूल्यांकनात प्रत्यक्ष शाळांना भेट देऊन शालेय अभिलेख तसेच पुरावे, भौतिक सोयी-सुविधा, शाळा व्यवस्थापन समिती, नव्या उपक्रमांची पाहणी केली जाते. त्यासाठी प्रशिक्षक निर्धारक गट तयार करण्यात आले आहेत. हे प्रशिक्षित केलेले निर्धारक शाळांची श्रेणी अंतिम करणार असून, त्यानुसार त्या त्या गटात शाळांची विभागणी केली जाणार आहे. राज्यातील सर्वच माध्यमांच्या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी आणि शालेय विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत शाळासिद्धी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मूल्यांकन व प्रमाणीकरण करून घेण्याच्या दृष्टिकोनातून १00 टक्के स्वयंमूल्यांकन शाळासिद्धी पोर्टलवर माहिती द्यावी लागते; मात्र ती देण्यास शाळा अद्यापही तयार नाहीत. त्यामुळे शाळांनी येत्या चार दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी दिले आहेत.
शाळासिद्धी मूल्यांकनात शाळा माघारलेल्याच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 2:01 PM